नाचणी, वरीचे नवीन वाण विकसित; ३५ टक्के जास्त पीक

उत्तम गावकर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

प्रत्येक तालुक्यात ५ शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण, कृषी खात्याचे शेती उत्पन्न वाढवण्यावर प्रयत्न

सासष्टी: गोव्याच्या अन्न संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेले, पण बदललेल्या जीवनशैलीमुळे मागे पडलेल्या नाचणी व वरीचे गोव्यात पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. नाचणी व वरीचे ३५ टक्के जास्त पीक देणारे वाण विकसित करण्यात आले असून, या वाणापासून तयार केलेले बियाणे प्रत्येक तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे. या बियाण्याची लागवड करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. 

नाचणी व वरी या धान्यांमध्ये भरपूर जीवनसत्वाचा समावेश असल्यामुळे आधी गोमंतकीय शेतकरी मोठ्या प्रमाणात नाचणी व वरीची लागवड करीत होते. पण, नंतर भाताच्या विकसित केलेल्या संकरित बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी जीवनसत्त्वे असलेल्या नाचणी व वरीची लागवड करण्यास बंद केले. गोमंतकीय शेतकऱ्यांनी नाचणी आणि वरीची पुन्हा लागवड करण्यास सुरुवात करावी, या हेतूने नाचणी आणि वरीचे विकसित केलेले संकरित वाण गोव्यतील प्रत्येक तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना देण्यात आले असून यातून जीवनसत्त्वे असलेलं नाचणी व वरीचे पुनरुज्जीवन होणार आहे. या लागवडीतून  शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळणार, अशी माहिती दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्रचे कृषी अधिकारी चंद्रहास देसाई यांनी दिली.
 
शेतकरी वर्गाकडून जास्त उत्पन्न मिळणाऱ्या बियाणांची लागवड करण्यास जास्त पसंत करण्यात येते. गोव्यात नाचणी व वरीचे संकरित वाण विकसित केले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाचणी व वरीची लागवड करण्यास बंद केले होते. पण, जीवनसत्त्वे मिळणारी ही नाचणी व वरीचे गोव्यात पुनरुज्जीवन करण्याचा उद्देशान दापोली येथील डॉ बाबासाहेब कृषी विद्यापीठाने  विकसित केलेल्या नाचणी व वरीची दापोली २ हे संकरित वाण आणून सांगे, केपे आणि काणकोण तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर वितरित करण्यात आले होते. नाचणी व वरीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना  बऱ्यापैकी पीक मिळाले असून या शेतकऱ्यांकडून ही बियाणी विकत घेऊन संपूर्ण गोव्यतील प्रत्येक तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना ही बियाणे देण्यात आली आहेत, असे देसाई यांनी सांगितले. 

खरीप हंगामात दापोली २ या नाचणी व वरीच्या बियाण्यांची डोंगराळ भागात लागवड करण्यात येत असून पाण्याची चांगली सुविधा असल्यास रबी हंगामातही लागवड करणे शक्य होणार आहे. वरीचे हेक्टरी १८ क्विंटल तर नाचणीचे हेक्टरी ३५ क्विंटल उत्पन्न देणारे असे हे बियाणे आहे. इतर प्रचलित बियाण्यापेक्षा या बियाण्याचे उत्पादन ३५ टक्के जास्त असून पिकाचा कालावधी ११० दिवसांचा आहे. भरघोस उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाचणी व वरीचे क्षेत्र कमी करून इतर पिकांचा पर्याय निवडला होता. पण, आता या बियाण्यापासून मिळणारे उत्पन्न पाहिल्यास शेतकरी निश्चितच या बियाण्याकडे आकर्षित होऊन याची लागवड करण्यासाठी पुढे येतील असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. 
 
या बियाण्यांची लागवड करण्यासाठी दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात असून शेतकऱ्यांना मिळालेल्या पिकाचे मार्केटिंग करण्यासाठी दक्षिण गोव्यात शेतकऱ्याचा गट स्थापन करण्यात येणार आहे. गट स्थापन केलेल्या शेतकऱ्यांचा कृषीमाल गोवा बागायतदार व कृषी संस्थांना विक्री करण्यात येणार आहे. नाचणी व वरीला जीवनसत्त्वाचा दृष्ट्या महत्वही असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दरही मिळणार असून गोमंतकीयाना सहजरीत्या नाचणी व वरी मिळणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.  नाचणी व वरीचे पिकांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या