दाभाळमधील मुकबधिरांवर अन्याय: राजन घाटे

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

किर्लपाल दाभाळ पंचायत क्षेत्रातील मलारीमळ - कोडली येथील युवती तारा गावकर हिच्या मुकबधीर आईवडिलांवर अन्याय झाला असून त्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे न्याय मिळण्यासाठी दाद मागणार आहे.

फोंडा: किर्लपाल दाभाळ पंचायत क्षेत्रातील मलारीमळ - कोडली येथील युवती तारा गावकर हिच्या मुकबधीर आईवडिलांवर अन्याय झाला असून त्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे न्याय मिळण्यासाठी दाद मागणार आहे. सरकारकडून ज्येष्ठांना न्याय न मिळाल्यास पणजी येथील आझाद मैदानावर धरणे धरणार असल्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ता राजन घाटे यांनी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यावेळी युवती तारा गावकर हिचे मुकबधीर आई सुलक्षा संतोष गांवकर, वडील संतोष भानू गांवकर, काकी आनंदी आनंद गावकर, चुलतभाऊ भानुदास आनंद गावकर, शैलेश विर्डीकर उपस्थित होते.

राजन घाटे यांनी सांगितले, की तारा गावकर हिचे वडील संतोष गावकर, काका आनंद गावकर यांच्याकडे सुमारे २१ हजार चौरस मीटर जागेचा मालकी हक्क असून त्यामुळे संबंधिताकडून अन्याय केला जात आहे. सरकारने मुकबधिरांना न्याय मिळण्यासाठी पावले उचलली पाहिजे. परंतु सरकारला मुकबधीर ज्येष्ठांसाठी कळकळ नसून सरकारच मुकबधीर झाल्याचा आरोप राजन घाटे यांनी केला. मुकबधीर संतोष गांवकर यांनी किर्लपाल दाभाळ पंचायतीत १९८९ साली दिलेल्या दाखला विना प्रतिज्ञापत्राद्वारे एकाच रस्त्यासाठी दिला होता. त्यावेळी त्या दाखल्यासाठी पंचायत सरपंचाची सही असून पंचायत सचिवाची सही नसल्याने त्यामुळे तो ग्राह्य नसल्याचे दिसून येत असल्याचे पुरावे पत्रकारांना दाखविले.

सरकारकडून बहुजन समाजाला न्याय मिळत नसल्याचा आरोप राजन घाटे यांनी केला. या मुकबधीर गावकर कुटुंबाला न्याय न मिळाल्यास आपल्याला पुढचे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा घाटे यांनी दिला. भानुदास गावकर यांनी सांगितले, की आपल्या काका व वडिलांच्या जागेतून तीन अंतर्गत रस्ते केलेले असून त्यामुळे आम्हाला बागायत करण्यासाठी फेन्सींग करण्यास मिळत नाही. प्रत्येकाच्या घराकडे जाण्यासाठी पंचायतीने केलेले रस्ते हटवून आमची जागा मोकळी करून देण्याची मागणी केली.

शैलेश विर्डीकर यांनी सांगितले, की किर्लपाल दाभाळ पंचायतीने माझ्या आजीच्या नावे असलेल्या जमिनीतून दाखल्याविना रस्ता केला असून तीनच मीटरचा रस्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे. आनंदी गावकर यांनी आम्ही नसताना पंचायतीने रस्ता करून दिला असून त्यानंतर दगड घालतेवेळी हरकत घेतली होती. देवस्थानाकडे जाण्यासाठी आमची हरकत नसून केलेल्या तिन्ही रस्त्यावरील दगड काढून जागा मोकळी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या