'त्या' बनावट नोट प्रकरणाचा मुख्यसूत्रधार राजदीप सिंग

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

बनावट नोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चंदिगडच्या पाच संशयितांपैकी राजदीप सिंग याने स्वतः या बनावट नोटा छापल्याची कबुली पणजी पोलिसांना दिली आहे.

पणजी: बनावट नोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चंदिगडच्या पाच संशयितांपैकी राजदीप सिंग याने स्वतः या बनावट नोटा छापल्याची कबुली पणजी पोलिसांना दिली आहे. मध्यप्रदेश येथून अटक केलेल्या नारायण सिंग याने या नोटा छापल्या नसून त्याने राजदीप याला अफिम हा अमलीपदार्थ पुरविला होता, असे चौकशीत सांगितले आहे. या बनावट नोटाप्रकरणी इतर संशयितांनाही कल्पना होती असे चौकशीत समोर आले आहे.   

पोलिसांनी चंदिगडच्या पाच संशयितांना अटक केल्यानंतर संशयित राजदीप सिंग याने बनावट नोटा नारायण सिंग याने छापण्यास मदत केली होती असे उघड केले होते. त्यामुळे पोलिसांनी नारायण सिंग याचा शोध घेतला व त्याला गोव्यात आणले. राजदीप व नारायण या दोघांनाही समोरासमोर बसवून पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांनी चौकशी केल्यावर राजदीप याने गुन्हा कबूल केला आहे. त्याने बनावट नोटांचे ‘डायस’ करून त्या कागदावर छापल्या व त्यानंतर कट करून त्याचे बनावट चलन तयार केले. कळंगुट येथील एका हॉटेलवर संशयित उतरले होते, तेथे टाकलेल्या छाप्यात कागदावर छापलेल्या नोटा तसेच कटर सापडला होता. त्याने गोव्यात येण्यापूर्वी

या नोटा ज्या प्रिंटरवर छापल्या आहेत तो चंदिगड येथे दुरुस्तीसाठी दिला असल्याचे सांगितले आहे. हा प्रिंटरही ताब्यात घेण्यासाठी पणजी पोलिस पथक जाणार आहे. त्याने या बनावट चलनी नोटा काही खऱ्या नोटांबरोबर खपविण्याचे उद्देशाने तयार केल्या होत्या असे समोर आले आहे. 

संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या काही बनावट चलनी नोटांवरील क्रमांक एकच नाही. नोटावर असलेला क्रमांक त्याच्या मागील बाजूला नाही. तसेच या नोटांवर असलेल्या चकाकणाऱ्या स्ट्रीप्सही चिटकवलेल्या आहेत. या बनावट नोटा व अधिकृत नोटा यामध्ये पाहिल्यास कोणताच फरक दिसत नाही. या बनावट नोटा हुबेहुब खऱ्या असल्यासारख्या दिसतात. पेट्रोल पंप किंवा किरकोळ व्यापारी यांना फसवणे शक्य आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या