अभियंता बढती घोळ लवकरच मार्गी; राजीव सामंत यांच्‍याकडे अभियंतापदाचा ताबा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

राज्य सरकारने वीज खात्याच्या मुख्य अभियंतापदाचा ताबा राजीव रामदास सामंत यांच्याकडे दिला आहे. ‘गोमन्तक’ने ‘दिव्याखाली अंधार’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी वीज खात्यातील बढतीतील घोळ मिटवू असे नमूद केले होते.

पणजी: राज्य सरकारने वीज खात्याच्या मुख्य अभियंतापदाचा ताबा राजीव रामदास सामंत यांच्याकडे दिला आहे. ‘गोमन्तक’ने ‘दिव्याखाली अंधार’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी वीज खात्यातील बढतीतील घोळ मिटवू असे नमूद केले होते. त्याचीच सुरवात म्हणून सेवा ज्येष्ठतेनुसार सामंत यांच्याकडे मुख्य अभियंतापदाचा ताबा देण्यात आला आहे. ते आपले काम सांभाळून मुख्य अभियंता म्हणूनही कर्तव्य निभावतील, असे कार्मिक खात्याने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

राष्ट्रकुल प्रमुखांच्या परिषदेवेळी वीज खात्यात कनिष्ठ अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आली होती. त्यातील बहुतांशजण पदविकाधारक होते. पुढे सहाय्‍यक अभियंता आणि कार्यकारी अभियंतापदी बढती देताना त्यांची पदविका आड आली. त्यामुळे त्यांना बरीच वर्षे बढती नाकारण्यात आली. त्यांना कार्यकारी अभियंतापदी काम करण्याचा पुरेसा अनुभव नसल्याने त्यांना पर्यवेक्षक अभियंतापदी बढती मिळू शकत नव्हती.

खात्यात मुख्य अभियंतापदी काम करण्यासाठी लायक उमेदवार नसल्याने अलीकडे प्रतिनियुक्तीवर मुख्य अभियंतापद भरून काम चालवले जात होते. त्यामुळे आम्हाला बढतीची आणि खात्याचे सुकाणूपद सांभाळण्याची संधीच मिळणार नाही, अशी भावना बहुतांश कार्यकारी अभियंत्यात रुजली होती. त्यावर आधारीत दिव्याखाली अंधार ही वृत्तमालिका ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झाली होती.

त्या वृत्त मालिकेची दखल घेत वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी हा घोळ मिटवू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता वीज खात्यातील सर्वात ज्येष्ठ कार्यकारी अभियंत्याकडे हे पद सोपवण्यात आले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या