एससी-एसटी आयोग चेअरमनपदासाठी माजी मंत्री रमेश तवडकर यांचे नाव आघाडीवर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

गोवा राज्य अनुसूचित जाती- अनुसूचित जमाती आयोगाच्या रिक्त झालेल्या चेअरमनपदासाठी माजी आमदार रमेश तवडकर यांचे नाव आघाडीवर आहे. उद्या, सोमवारी कदाचित नव्या चेअरमनच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पणजी: गोवा राज्य अनुसूचित जाती- अनुसूचित जमाती आयोगाच्या रिक्त झालेल्या चेअरमनपदासाठी माजी आमदार रमेश तवडकर यांचे नाव आघाडीवर आहे. उद्या, सोमवारी कदाचित नव्या चेअरमनच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

या आयोगाच्या चेअरमन पदाच्या व्यक्तीसाठी वयोमर्यादा वाढविण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे माजी आमदार प्रकाश वेळीप यांना दोन वेळा त्या पदावर जाण्याचा मान मिळाला. सुरुवातीला १२ मे २०१७ त ५ मे २०१८ या काळात प्रथम वेळीप चेअरमन राहिले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात या पदासाठी असणाऱ्या वयाच्या अटीमध्ये बदल केला होता. 

चेअरमनपदासाठी बदललेल्या वयाच्या अटीचा फायदा वेळीप यांना झाला. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ मध्ये २२ तारखेला वेळीप यांना पुन्हा चेअरमन होण्याचा मान मिळाला. दोन वर्षे काम करण्याची संधी वेळीप यांना मिळाली. या महिन्याच्या ५ सप्टेंबरला वेळीप यांची मुदत संपली. त्यामुळे त्या पदावर ता. ६ रोजी दुसऱ्या चेअरमनची निवड होणे अपेक्षीत होते. परंतु मुख्यमंत्री कोरोनामुळे घरगुती विलगीकरणात राहून उपचार घेत होते. 

दोन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जाण्यास सुरुवात केली आहे. प्रकाश वेळीप यांच्यानंतर जर या आयोगाच्या चेअरमन पदावर रमेश तवडकर यांची नियुक्ती झाली तर तेही वंचित घटकाला न्याय देऊ शकतात. सध्या या आयोगाच्या चेअरमनपदासाठी तवडकर यांची प्रबळ दावेदारी मानली जात आहे. राजकारणाचा एक भाग म्हणून त्यांचे पुनर्वसन करून भाजप सरकार आपली चाल यशस्वी झाल्याचे दाखवेल.  कारण काणकोणमध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेले इजिदोर फर्नांडिस आणि तवडकर यांच्यात सध्या तूतू मैंमै सुरु आहे. ते भाजपला सध्या तरी नको आहे. तरीसुद्धा या मुद्यावर राज्यात चर्चा होत असून सोमवारी  या प्रकरणावर पडता पडण्याची शक्यता आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे चेअरमनपद ५ सप्टेंबरला रिक्त झाले. त्यामुळे ६ सप्टेंबरला नव्या चेअरमनची निवड होणे गरजेचे होते. आम्ही त्या विषयाची चेअरमन पदासाठी इच्छुक नावांची फाईल मुख्यमत्र्यांकडे पाठविली आहे. - गोविंद गावडे, मंत्री समाजकल्याण खाते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या