बेरोजगारीत गोवा पाचव्या क्रमांकावर!

इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या युवकांना रोजगार देण्यात सरकार पडत आहे कमी
बेरोजगारीत गोवा पाचव्या क्रमांकावर!
Unemployment Dainik Gomantak

गोवा: सेंटर फॉर मोनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात बेरोजगारीत गोवा देशात पाचव्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. राज्यात काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके सोडल्यास व्यवसायच नसल्याने येथील युवकांना बेरोजगारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राज्यात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, पण त्या प्रमाणात इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या युवकांना रोजगार देण्यात सरकार कमी पडत आहे.

त्यामुळे राज्यातील युवकांना रोजगाराच्या शोधार्थ इतर राज्यात व परदेशात जाण्याची वेळ आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी घेतलेल्या काही पदवीधर नाईलाजाने अगदी तुटपुंज्या वेतनावर काम करतात, तर अनेकजणांच्या नशिबी बेरोजगारीच आहे. सरकारने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली, त्यासाठी लागणारा आर्थिक भारही उचलला, पण सरकारचे कर्ज घेऊन शिकलेल्या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीला सामोरे जावे लागत असल्याने सरकारचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे? अशा विवंचनेत ते अडकले आहेत. त्यामुळे सरकारने राज्यात रोजगार निर्मिती करणारे उद्योग आणून बेरोजगारीची समस्या सोडविणे आवश्‍यक आहे. ∙∙∙

Unemployment
Goa Sand extraction: पुराव्यांनिशी माहिती देऊनही कारवाई नाही

सासष्टीतील भाजप कार्यकर्ते ‘उल्हास’ भरोसे!

‘बुडत्याला काडीचा आधार’ अशी मराठीत एक म्हण आहे. सासष्टीतील भाजप कार्यकर्त्यांना आता नावेली मतदारसंघाचे आमदार उल्हास तुयेकर यांचा आधार हवाय. साष्टीकरांनी भाजपला नाकारल्याने व आठपैकी सात मतदारसंघात इतर पक्षाचे आमदार असल्याने कामासाठी जायचे कोणीकडे असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडणे स्वाभाविक. निवडणुकीत हार पत्करावी लागलेले पडेल उमेदवारही हतबल झाले होते. मात्र, नावेलीचे आमदार व कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांना पक्षाने सासष्टीतील कार्यकर्त्यांची कामे करण्यासाठी आठवड्यात एकदा भाजपाच्या जिल्हा कार्यालयात बसण्यास सांगितले आहे. काही का असेना साधे साधे उल्हासभाई आता मोठे नेते झाले की. या नव्या जबाबदारीमुळे उल्हास ही खूष आणि सासष्टीतील कार्यकर्तेही खूष. ∙∙∙

युरी यांनी पुन्हा पत्ता बदलला?

‘जो वादा किया ओ निभाना पडेगा’ हे गाणे आपण ऐकलेच असणार. मात्र, राजकारणी याला अपवाद आहेत. ‘जो वादा किया ओ निभाना नहीं’ असेच सध्या राजकारण्यांकडून घडत आहे. युरी आलेमाव यांनी आपला वार्का येथील पत्ता बदलून कुंकळळी केला होता. मात्र, निवडणूक संपली, युरी जिकले आणि पुन्हा आपल्या गावी गेले. युरींचे वडील असताना कुंकळ्ळीकरांना वारक्याला जावे लागत असल्याने जनतेने त्यांचा पराभव केला होता आता युरींनी दिलेला शब्द पाळला नाही. युरी आठवड्यात फक्त एकदाच भेटणार म्हणजे आता कुंकळळीकरांना पुन्हा एकदा वार्का गेटवर थांबावे लागणार हे निश्चित. ∙∙∙

कथा काणकोण आरोग्य केंद्राची

काणकोण सामाजिक आरोग्य केंद्र हे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाखालोखाल वैद्यकीय सुविधांबाबत मोडते. पूर्वी येथे डाँक्टरांची पुरेशी संख्या नव्हती, परंतु आरोग्यमंत्र्यांच्या तत्परतेमुळे ती समस्या दूर झाली आहे. विविध विभागात डॉक्टर आहेत. अपवाद फक्त सर्जरीचा. तेथे सर्जन आला तर ते परिपूर्ण केंद्र बनणार आहे, पण तेथील रुग्णांना समस्या आहे ती औषधांची. तेथे औषधांचा मुबलक पुरवठा होत असला तरी तेथील औषधालयांतून तो रुग्णांना देण्यात हात आखडता घेतला जातो. डॉक्टर लिहून देतात त्या प्रमाणात ती दिली जात नाहीत. त्याबाबत विचारणा केल्यास इतके सांगितले जाते की भीक नको पण कुत्रा आवर अशी गत रुग्णांची होते. ∙∙∙

तेलही गेले...तुपही गेले...!

कुठली अवदसा आठवली आणि भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात उडी मारली, असे म्‍हणण्‍याची वेळ माजी मंत्री मायकल लोबो यांच्‍यावर आली आहे. नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी त्‍यांना एकावर एक धक्के देणे सुरूच ठेवले आहे. एवढेच नव्‍हे तर गुन्‍हे नोंद करण्‍याचाही इशारा दिला आहे. त्‍यामुळे लोबो बॅकफूटवर गेले आहेत. ‘हा राजकीय सूड’ असे ते म्‍हणत असले तरी राणेंनी त्‍यांच्‍या गळ्‍याभोवतालचा फास आवळला आहे. त्‍यामुळे लोबो बॅकफूटवर गेले आहेत.

भाजपमध्‍ये असताना लोबोंचा जो थाट होता, तो आता राहिलेला नाही. पूर्वी ते मंत्री तसेच मुख्‍यमंत्र्यांवरही शरसंधान साधून आपण कमी नसल्‍याचे दाखवून न्‍यायचे. भाजपचे काही नेतेही त्‍यांना दचकून असायचे. पण काँग्रेसमध्‍ये गेल्‍यापासून त्‍यांचे ग्रह फिरू लागले आहेत. मंत्रिपद गेलेच आणि आता टीसीपीचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. ‘तेलही गेले अन्‌ तुपही गेले...हाती आले धुपाटणे’ असे म्‍हणण्‍याची वेळ लोबोंवर आली आहे. ∙∙∙

विजय पै खोत कुठे?

विधानसभा निवडणूक होऊन मतमोजणी झाली व त्या दिवसापासून बेपत्ता झालेले माजी आमदार विजय पै खोत मतदारसंघातून दिसेनासे झाले असल्याचे त्यांचे कार्यकर्तेच बोलू लागले आहेत. यावेळी भाजपने रमेश तवडकर यांना उमेदवारी जाहीर केल्यावर विजयबाब यांनी भाजपमधून बाहेर पडून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यांच्या समर्थकांनी त्यावेळी ते भाजपलाच समर्थन देतील असा प्रचार चालविला होता व विजय हे स्वतः आपणाला अमूक हजारांची आघाडी मिळेल असे सांगत होते, पण प्रत्यक्षात झाले भलतेच. मतमोजणीवेळी कुठेच आघाडी तर नव्हे, पण दुसरे वा तिसरे स्थानही मिळत नसल्याचे पाहून बाहेर पडलेले विजयबाब परत सार्वजनिक ठिकाणी फिरकलेले नाहीत. ∙∙∙

राजकीय हेतूने कारवाई

पर्रा येथे भराव टाकून जमीन बुजवल्याप्रकरणी कॉंग्रेसचे आमदार दांपत्य मायकल लोबो आणि दिलायला लोबो यांच्यावर म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. निवडणुकीनंतर भाजप सरकार सत्तेवर आले. खातेवाटप झाल्यानंतर इतर कोणतेही मंत्री इतके ॲक्टीव्ह झाले नसतील, तेवढे विश्‍वजीत राणे आक्रमक पद्धतीने बेकायदा बांधकामांविषयी धडाकेबाज कारवाई करताना दिसत आहेत.

खरे तर त्यांची ही कारवाई सर्वांच्या डोळ्यांत भरणारी आहे. मात्र, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून तिला राजकीय वास येत असल्याची टीका होत आहे. कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वी हेच मायकल लोबो भाजपमध्ये होते. तसेच लोबो यांनी जमीन बुजवल्याची घटना रातोरात घडलेली नाही. ती यापूर्वी कितीतरी महिने आधी बुजवली असेल. मग लोबो दांपत्यावर आताच कारवाई का? की त्यांनी पक्ष बदलला म्हणून ही कारवाई केली जात आहे? अशा प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत. ∙∙∙

सरजी, हा कसला बदला?

‘कोंगो खाता रोव आनी लेवाण्याक मार’ अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे. जे करतात ते वेगळेच राहतात. मात्र, भरावे लागते भोळ्या भाबड्यांना. निवडणुकीत जो मतदार आपल्या विरोधात वावरला त्याला अद्दल घडविण्यासाठी निवडून आलेला आमदार आपली शक्ती खर्ची करतो. बदला घ्यायचाच तर मोठ्यांशी घ्यावा. शिकार राजाची करावी प्याद्यांची नव्हे. दक्षिण गोव्यातील एका पोलिस शिपायाने तत्कालीन आमदार जे गेल्या विधानसभेत हरले त्यांचा फोटो फेसबुकवर शेर केला म्हणून त्या शिपायाच्या आमदाराने रागाच्या भरात त्याचा बदला घेण्यासाठी पणजीला बदली केली. बिचारा पोलिस शिपाई आता दररोज दीडशे किलोमीटर प्रवास करून नेहमी पणजीला जातो. आता त्या शिपायाचे मित्र आमदाराला सांगायला लागले आहेत... सरजी, बदला मोठ्यांशी घ्या छोट्याशी नव्हे..! ∙∙∙

Unemployment
गोमेकॉ प्रवेशद्वारासमोरील ‘सब-वे’ मृत्यूचा सापळा

कदंब महामंडळात तळीराम

कदंब महामंडळात असलेल्या तळीरामांमुळे प्रवाशांना कसा त्रास सहन करावा लागतो त्याचे उदाहरण नुकतेच पुढे आले आहे. मडगावात एका ज्येष्ठ नागरिकाने कदंब शटलचे तिकीट काढले. मात्र, त्याला ती बस पकडता आली नाही. त्यामुळे तिकीट काउंटरवरील कदंब कर्मचाऱ्याने त्याला दोन तास ताटकळत ठेवले.

सोबतच्या कर्मचाऱ्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आपण सध्या ‘हाय’ झालेलो आहे, तेव्हा माझ्याकडे सांभाळून बोला अशी ताकीद त्याने इतर सहकाऱ्यांना दिली. कित्येक कदंब कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांची सतावणूक होते. मात्र, ती कधी उघड होत नाही. अनासाये ही घटना उघडकीस आली आहे. कदंब बसस्थानके चकाचक करण्यास पुढे सरसावलेले उल्हासराव या असल्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणू शकतील का? ∙∙∙

वळणांत हरवला चोर्ला घाट!

चोर्ला घाट हा बेळगाव - गोवा दरम्यानचा कमी अंतराचा मार्ग आहे. सध्या अनमोड घाटातील महामार्गाचे दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे चोर्ला घाटातील वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गावर अवजड वाहनांची गर्दी होत असल्याने या मार्गावर दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यातच हा रस्ता खराब असल्याने अपघातांत आणखी भर पडत आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चोर्लाघाट रस्त्याची गंभीर दखल घेऊन दर्जाहीन कामाबाबत संबंधितावर त्वरित कारवाई केली. त्यामुळे आजपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

4 ते 11 मे दरम्यान त्यासाठी हा रस्ता अवजड वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. आता प्रश्‍न पडला आहे, तो आठ दिवसांत या वळणात हरवलेल्या चोर्ला घाट मार्गाची दुरुस्ती कशी होणार तो. या रस्त्याची नीट दुरुस्ती होणार की पुन्हा केवळ मलमपट्टीच अशी सध्या चर्चा सुरू आहे. या रस्त्यावर पुन्हा पुन्हा डांबर ओतून रस्ता उंच झाला आहे व डांबरकरणाच्या बाजूचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे वळणार एखाद्या वाहनाला बाजू काढताना दुसरे वाहन रस्त्याकडेच्या खड्ड्यांत किंवा चरात जाऊन कलंडण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करताना तो समपातळीत होईल याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. ∙∙∙

स्वतंत्र राष्ट्र मागणारे राष्ट्रप्रेमी की द्रोही?

‘कसणाऱ्यास पेज व झोपणाऱ्यास भात’ अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे. सुभाष वेलिंगकर यांनी गोंयच्या सायबावर प्रश्नचिन्ह केले म्हणून त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा नोंदवावा असे अल्पसंख्याक नेते मागणी करतात. मात्र, गोव्याचे बळजबरीने भारतात विलीनीकरण केले ती चूक सुधारा व गोवा हे स्वतंत्र राष्ट्र घोषित करा अशी मागणी युनोत करणारे ते चार हजार गोमंतकीय मात्र राष्ट्रप्रेमी ठरतात? राष्ट्रदोह चालवायचा तो त्या देशद्रोह्यांवर की वेलिंगकर यांच्यासारख्या देशप्रेमीवर? ∙∙∙

म्हणे, हा आमचा वाॅर्ड नाही

भाटले येथील सटी देवळाजवळ एक नाला आहे. हा नाला पावसापूर्वी साफ करावा लागतो. आता या नाल्यात माती, कचरा पडत आहे. तो स्वच्छ करावा म्हणून स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोनही केले. अधिकारी लक्ष देत नसल्याने काहींना नगरसेवक आणि महापौरांच्या लक्षातही ही गोष्ट आणून दिली. महापौरांनी करतो करतो सांगत वेळ मारून नेली. त्यामुळे लोकांनी नगसेवकांकडे कामासाठी आग्रह धरला आहे. मात्र, हा वाॅर्ड आम्हाला पडत नाही, असे एका महिला नगरसेविकेने सांगितले. मत मागताना मात्र हेच उमेदवार सर्वत्र फिरतात. तेव्हा त्यांना वार्ड क्र. दिसत नाही का, निदान लोकांच्या कामांसाठी तरी हा वार्ड तो वाॅर्ड करू नका. समस्या सोडवा, अशी अपेक्षा त्या बिचाऱ्या नागरिकांची आहे. बघूया कोण नगसेवक पुढे येतो ते... ∙∙∙

पोलिस लक्ष देणार का?

गोव्यात येणारे पर्यटक मद्यधुंद अवस्थेत वाहने हाकतात व इतरांचे बळी घेतात. हे प्रकार हल्लीच्या काळात वाढत चालले आहेत. नव्या वाहतुक नियमांची अंमलबजावणी होत असताना हे घडत आहे याबद्दल लोकांमध्ये सवाल होऊ लागलेले आहेत. काणकोणमधील पाळोळे वा आगोंद किनाऱ्यावर अशाप्रकारे रेंट अ कार वा बाईक घेऊन जाणाऱ्यांची रीघ राष्ट्रीय महामार्गावर आढळते. हे पर्यटक सर्व नियम खुंटीवर टांगून वाहने हाकतात व त्यामुळे इतरांचा जीव टांगणीला लागतो. वाहतुक पोलिसांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ∙∙∙

Unemployment
'काणकोणचे रवींद्र भवन 19 डिसेंबरपर्यंत पूर्ण'

काणकोणने संधी साधली

अखेर ‘आयआयटी’साठी काणकोणात जागेची पाहणी सुरू झाली आहे. राज्यातील हा भव्यदिव्य शैक्षणिक प्रकल्प काणकोणात उभारणार असल्याने तालुक्याचे भाग्य उजळणार, हे निश्‍चित! कारण एकमेव आयआयटी प्रकल्प नव्हे, तर काणकोणला शैक्षणिक हब बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडला आहे.

याचे श्रेय सभापती रमेश तवडकर यांनाही जाते. मेळावली येथे या प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर तो बारगळल्यातच जमा झाला होता. मात्र, काणकोणवासीयांची सकारात्मक मानसिकता आणि सभापती तवडकर यांचा पाठपुरावा यामुळे हा प्रकल्प लवकरच काणकोणात मार्गी लागणार आहे. एकदा का काणकोणात शैक्षणिक हब झाला, तर तालुक्यात विकासाच्या घोडदौडीला कोणीच लगाम घालू शकणार नाही. त्यामुळे मेळावलीवासीयांनी दवडलेली संधी काणकोणवासीयांनी साधली, अशी चर्चा सध्या सुरू आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.