गोवा देशातील चौथे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य: नीति आयोग

गोवा देशातील चौथे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य: नीति आयोग
goa State.jpg

पणजी: नीति आयोगाने (Niti Aayog) आज गुरुवारी जारी केलेल्या ‘शाश्वत विकास (Sustainable Development) उद्दिष्ट भारत निर्देशांक 2020-21 या अहवालात गोव्याचा देशात चौथा क्रमांक आला आहे. यापूर्वी गोवा सातव्या क्रमांकावर होता. याचा अर्थ ‘कोविड’ महामारीच्या काळात सर्व अडथळ्यांवर मात करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आपल्या कार्यकुशलतेने राज्याची प्रगती घडवून आणली आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेचा मारा सुरू ठेवला असतानाच सरकारची ही प्रगती उठून दिसणारी आहे. 

‘स्वच्छ पेयजल व स्वच्छता’ या निकषांत राज्याने देशात लक्ष्यद्विपसह पहिला क्रमांक पटकावला आहे. आयोगाने आपल्या 190 पानी अहवालात गोव्याचा उल्लेख अग्रभागी असणाऱ्या यादीत केला आहे. सामाजिक, आर्थिक तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रांत प्रगती करणाऱ्या राज्यांमध्ये केरळ अव्वलस्थानी असून या निकषांवर बिहारची कामगिरी सर्वांत सुमार असल्याचे ‘शाश्वत विकास उद्दिष्ट भारत निर्देशांक 2020-21 या अहवालात आढळून आले आहे. नीति आयोगाने आज हा अहवाल जारी करताना केरळला सर्वोत्तम कामगिरीचे प्रशस्‍तिपत्र दिले. या क्रमवारीमध्ये हिमाचल प्रदेश, तमिळनाडू या राज्यांच्या खालोखाल महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. 

नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्तीचे अध्ययन असलेला भारत एसडीजी निर्देशांक अहवाल आज प्रसिद्ध केला. विकासाच्या मापदंडांवर राज्यांची तसेच केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी ठरविण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राजीवकुमार यांनी केले. डिसेंबर 2018 पासून अशा प्रकारे शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकाची सुरवात झाली असून विविध उद्दिष्टे तसेच संकेतांकांच्या आधारे राज्यांची कामगिरी तपासण्यात येते. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण यासारख्या क्षेत्रांमधील कामगिरीच्या आधारे नीति आयोगातर्फे राज्‍यांची क्रमवारी ठरविली जाते.    

या राज्यांची सुमार कामगिरी
चांगल्या कामगिरी सोबतच सुमार कामगिरी करणाऱ्या राज्यांचीही क्रमवारी नीति आयोगाने तयार केली असून शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यात सातत्याने पिछाडीवर राहणाऱ्यांमध्ये बिहार आघाडीवर आहे. त्यातुलनेत झारखंड, आसाम, राजस्थान, छत्तीसगड आणि ईशान्य भारतातील राज्यांची कामगिरी काही प्रमाणात बरी आहे. बिहारचे 51 गुण आहेत. तर झारखंडचे 56 गुण, आसामचे 57 गुण आहेत. अरुणाचल प्रदेश, मेघालय, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे संयुक्तपणे 60 गुण आहेत. तसेच संयुक्तपणे 61 गुण असलेल्या छत्तीसगड, नागालॅन्ड आणि ओडिशा या राज्यांची कामगिरी काहीशी सरस आहे.

जनतेच्या सहकार्याने सातत्यपूर्ण आणि सर्वांनी केलेल्या कामामुळे हे यश मिळाले आहे. ज्या पद्धतीने सर्वजण काम करत होते त्यावरून यंदा या क्रमवारीत३-४ क्रमांक मिळेल अशी खात्री होती. या साऱ्याचे श्रेय जनतेची सरकारप्रती असलेला विश्वास आणि प्रशासनाचा निर्धार यांना जाते. पेयजल आणि स्वच्छता निकषांत राज्याने पहिला क्रमांक पटकावला हेही निश्चितच सर्वांसाठी भूषणावह आहे' असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com