Ravi Naik: फोंड्याच्या पात्रांवाचा विनोद 'खरी कुजबुज'

फोंड्याचे पात्रांव कधी कुठे आणि कसा विनोद करतील सांगता यायचे नाही.
Ravi Naik |Goa News
Ravi Naik |Goa NewsDainik Gomantak

फोंड्याचे पात्रांव कधी कुठे आणि कसा विनोद करतील सांगता यायचे नाही. रवी नाईक कृषिमंत्री असल्याने यावेळेला त्यांनी एक वेगळीच कल्पना काढली आणि ती यशस्वीही केली. ती म्हणजे कृषी खात्यातर्फे पाणी वाचवा आणि जमीन वाचवा हा संदेश देण्याची.

तेरेखोल - पेडणे ते मडगाव व पुढे काणकोणपर्यंत या मोटारसायकल रॅलीत युवकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि जनजागृतीची ही एक वेगळीच कल्पकता असल्याचे रवी नाईक यांनी सिद्ध केले. अर्थातच ही सगळी कल्पना त्यांचीच होती, हे वेगळे सांगायला नको.

पण मुख्य गोम म्हणजे या रॅलीत त्यांनी युवकांना छान मार्गदर्शन केले आणि शेवटी काणकोण येथे पोचल्यावर ‘निवांत बसा’ असे सांगितले. आता निवांत बसा म्हटल्यावर काहीजण वेगळाच अर्थ काढतील, पण पात्रावाच्या म्हणण्यानुसार दिवसभर श्रम केले ना, आता निवांत विश्रांती घ्या, असे त्यांना म्‍हणायचे होते. मात्र, पात्रांवच्या विनोदावर सगळेजण हसले हे महत्त्वाचे.

लोकक्षोभाचा परिणाम

कायद्यापेक्षा लोकक्षोभ फार मोठा असतो याचा प्रत्यय कुर्टी महामार्गावर आला. त्याचे असे झाले, गेल्या आठवड्यात कुर्टी आमिगोसजवळ झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आणि प्रशासन खडबडून जागे झाले, पण उपयोग काय? कारण या रस्त्यावर कायम अवजड ट्रक पार्क करून ठेवले जायचे.

स्थानिकांनी पोलिसांना वेळोवेळी हा रस्ता मोकळा करण्यासाठी विनंती केली, निवेदने दिली. पण पोलिसांची कारवाई तात्पुरती. त्यामुळे कायम अपघातांचा धोका. त्या दिवशी अपघात झाला आणि चिडलेल्या स्थानिकांनी शेवटी मग्रूर ट्रकचालकांना असा काही चोप दिला की सारे सैरावरा पळत सुटले.

एक मात्र खरे त्या दिवसापासून रस्त्यावर एकही ट्रक दिसत नाही. आहे की नाही लोकक्षोभाचा परिणाम...!

कोण हा साहेब?

नो स्मोकिंग आणि नो ड्रिंकिंग हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. मात्र, त्याचा फायदा काही सरकारी अधिकारी घेऊ लागले आहेत. केपे येथे सध्या कित्येकांना असाच अनुभव येऊ लागला आहे. अबकारी खात्यातील अधिकारी असे सांगून कुणीतरी हे फलक लावा असे सांगून त्यांचे शुल्क म्हणून बारवाल्यांकडून पैसे उकळू लागला आहे.

कुणीही त्याला विचारलं तर साहेबांनी हा आदेश दिला आहे असे सांगितले जात आहे, पण खात्यात चौकशी केली, तर असा आदेश कुणीही काढलेला नाही अशी माहिती मिळते. त्यामुळे केपेतील बारवाल्यांना हा प्रश्न पडला आहे की हा अनामिक साहेब आहे तरी कोण?

वाचाळवीरांची चलती

गोव्यात सध्या वाचाळवीरांची भलतीच चलती दिसून येते. केवळ वृत्तपत्रातूनच नव्हे, तर समाज माध्यमातूनही ही मंडळी भलतीच चर्चिली जात आहे.

हल्लीच बाणावलीचे आमदार व साबांखा मंत्री यांच्यात रंगलेली जुगलबंदी असो वा त्यानंतर रास्त भाव दुकानांतील धान्य घोटाळ्यावरून अशाच प्रकारे मंत्री व आमदारांनी काढलेल्या एकमेकांच्या उखाळ्या - पाकाळ्या असो वा राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकमेकांवर जाहीरपणे करत असलेले आरोप प्रत्यारोप असोत. त्यातून साध्य काहीच होत नाही. लोकांची करमणूक होते व संबंधितांना समाधान वाटते एवढेच.

भाजपवाले बिथरले

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे पाहून भाजपवाले सध्या बिथरले आहेत. राहुल गांधी यांना सर्वसामान्य लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि राहुल गांधी जेथे जातात तेथे त्यांचे भव्य स्वागतही केले जात आहे.

त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीसाठी राहुलजींचे हे स्वागत भाजपला डोईजड जाणार की काय, अशी चर्चा जेथे तेथे सुरू आहे. त्यामुळेच आता राहुलजींच्या छोट्या छोट्या चुका पाहून त्यावर कमेंटस् करून ते समाज माध्यमापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न भाजपवाले करीत आहेत.

मात्र, काँग्रेसवाले म्हणतात, भाजपवाले हे सगळे धंदे मतदारांना उल्लू करण्यासाठी करीत आहेत, मतदार त्याला आता फसणार नाही. त्यामुळे पाहुया नेमके काय होते ते लोकसभा निवडणुकीत. कारण घोडा मैदान तर जवळच आहे ना..!

Ravi Naik |Goa News
Goa Tourism: 'किनाऱ्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करणार'- भिकाजी नाईक

सहकार क्षेत्राला गरज सहकार महर्षींची!

‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या घोष वाक्यावर उभी राहिलेली सहकार चळवळ स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न पूर्ण करण्यास साहाय्यभूत ठरायला हवी अशी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहकार सप्ताहाच्या समारोप सोहळ्यात व्यक्त केली. आज सहकार क्षेत्रात तरुण व नवीन पिढी येण्याची गरज आहे.

सहकार क्षेत्राला आलेली मरगळ दूर व्हायला हवी. संजीवनी साखर कारखान्याने मान टाकली. मडगाव अर्बनसारखी सहकार बँक बंद पडली. एकेकाळी मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केलेल्या म्हापसा अर्बनचे शटर कायमचे खाली आले.

गोवा डेअरीला मरगळ आलेली आहे, गोवा राज्य सहकारी बँक स्वतःच्या निधीने नवीन सॉफ्टवेअर बसविण्यासाठी आजही अधिकाऱ्याच्या असकार्याने त्रस्त आहे. सहकार क्षेत्राला आलेली ही मरगळ ज्या दिवशी दूर होईल, तो सहकार क्षेत्रातील सुदिन म्हणावा लागेल.

युरीबाब कुंकळ्ळीचे प्रदूषण विसरले का?

जनतेची स्मरणशक्ती कमी असते म्हणून राजकारण्यांनी जनतेला गृहीत धरले, तर त्याचे परिणाम राजकारण्यांना भोगावे लागतात हे आपण वेळोवेळी अनुभवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुंकळ्ळीकर कुंकळळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणामुळे त्रस्त आहेत.

राजकारणी केवळ वादा करतात, वचन देतात. मात्र, प्रत्यक्षात घातक प्रदूषण पसरविणाऱ्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवीत नाहीत. कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी निवडणुकीच्यावेळी प्रदूषणाच्या विरोधात कुंकळळीकरांबरोबर राहून प्रदूषण बंद करण्याचे आश्वासन दिले होते.

Ravi Naik |Goa News
Accident In Chorla Ghat: अपघातांचे सत्र सुरुच; चोर्ला घाटात मालवाहू ट्रकचा अपघात

युरीबाब सध्या विरोधी पक्षनेते झाल्यामुळे त्यांच्याकडे प्रदूषणाविरोधात आवाज काढण्यास वेळ नसावा. युरी समर्थक प्रदूषणाच्या विरोधात तावातावाने बोलतात. मात्र, युरीबाब आपले आश्वासन विसरलेत का? हे विचारण्याचे धाडस करीत नाहीत. परिणाम कुंकळ्ळीकर सकाळी उठल्यावर मासळीची उग्र घाण वास घेत दिवस सुरू करतात व आलिया भोगावी असावे सादर म्हणत गप्प बसतात.

सरकारी खात्यांत असमन्वय

राजधानी पणजीत इफ्फीचा माहोल सुरू झालेला आहे व या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जगभरातून आलेल्या प्रतिनिधींना व इतरांना दर्शन घडत आहे ते सर्वत्र खोदून ठेवलेल्या रस्त्यांचे. वास्तविक इफ्फी काळात ही गैरसोय होऊ नये म्हणून 5 डिसेंपर्यंत राजधानीतील रस्ते खोदाईवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली आहे, पण ती बंदी झुगारून जीएसआयडीसीने हे खोदकाम केल्याचा आरोप वाहतूक पोलिस करत आहेत.

मजेशीर बाब म्हणजे या एकंदर प्रकरणातून सरकारी खात्यात समन्वय नसल्याचे उघड झाले आहे. जीएसआयडीसी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत असल्याने तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com