गोव्यात चोवीस तासात कोरोनाचे ७१३ रुग्ण पॉझिटिव्ह

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

आरोग्य संचालनालयाच्यावतीने जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात २ हजार ६५७ जणांचे स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले. त्यात १ हजार ५७८ जण निगेटिव्ह आणि ७१३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३६६ जणांचा अहवाल येणे बाकी आहे.

पणजी: गुरुवारी दिवसभरात स्वॅबच्या चाचण्या घेतलेल्यांपैकी सर्वाधिक ७१३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचबरोबर मागील चोवीस तासांत आठजणांचा बळी गेला असून, आत्तापर्यंत बळींची संख्या २१२ वर पोहोचली आहे. त्याशिवाय ३०२ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

दुसरीकडे साखळी, फोंडा, पर्वरी आणि पेडणे आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात रुग्णसंख्या वाढत असून ती चिंतेची बाब बनली आहे.

आरोग्य संचालनालयाच्यावतीने जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात २ हजार ६५७ जणांचे स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले. त्यात १ हजार ५७८ जण निगेटिव्ह आणि ७१३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३६६ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. 

घरगुती अलगीकरण करून उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कालपर्यंत हा आकडा ३७६ वर होता. त्यात ७३ जणांची भर पडून तो ४४९ वर पोहोचला आहे.

चोवीस तासांतील बळी?
मागील २४ तासांत कोरोनामुळे आठजणांचा बळी गेला.  त्यात नावेली येथील ३८ वर्षीय युवक, कुडका-बांबोळी येथील ४७ वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ७९ वर्षी महिला, मडगाव येथील ७० वर्षीय पुरुष, नावेली येथील ७५ वर्षीय पुरुष, साखळी येथील ८० वर्षीय पुरुष, घोगळ येथील ७२ वर्षीय पुरुष आणि झुआरीनगर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आत्तापर्यंत कोरोनामुळे बळींची संख्या २१२ वर पोहोचली. 

आरोग्यमंत्र्यांनी बैठकीद्वारे घेतला आढावा
कोरोनामुळे राज्यातील सद्यस्थितीचा आढावा आज आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी बैठकीद्वारे माहिती घेतल्याची ट्विटद्वारे कळविले आहे. कोरोनामुळे अतिगंभीर असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी गोमेकॉमध्ये चार वॉर्ड आरक्षित केले आहेत. यामध्ये कोविड रुग्णांवर सुलभपद्धतीने उपचार कसे होतील, यावर चर्चा करण्यात आली. कोरोनाविरुद्धचा लढा मजबूत केला जात असून. याशिवाय कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर न्युमोनियाच्या रुग्णांवरही उपचार करीत आहेत. आम्ही कोरोनाच्या लक्षणांविषयी जनजागृती करीत असून, आमची टीम कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अविरत काम करीत असल्याचे राणे यांनी ट्विटद्वारे कळविले आहे.

एकूण पॉझिटिव्ह बरे झालेले मृत्यू
४७८२ ३०२ २१२

         
संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या