कोविड-१९: तीन दिवसांत सोळाशे रुग्ण घरी; २४ तासांत ९ जणांचा बळी

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

२४ तासांत ९ जणांचा बळी : दिवसभरात ३४४ जण पॉझिटिव्ह

पणजी:  राज्यात कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी मागील तीन दिवसांत १ हजार ६८० जण रुग्ण प्रकृती बरे झाल्याने घरी परतले आहेत. तर मागील चोवीस तासांत बळी गेलेल्‍यांत ९ जणांसह तीन दिवसांत एकूण २५ जणांचा मृत्‍यू झाला. आत्तापर्यंत एकूण बळींची संख्या २४५ वर पोहोचली आहे.

राज्य संचालनालयाच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर मागील शनिवारी ५३४, रविवारी ५५८ आणि आज ५८८ असे १ हजार ६८० रुग्ण बरे झाल्याचे लक्षात येते. त्याशिवाय शनिवारी ५९२, रविवारी ३५४ आणि आज ३४४ असे एकूण १ हजार २१० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मृत्‍युमुखी पडलेल्‍यांची आकडेवारी पाहिली तर मागील तीन दिवसांत ९+७+९ अशी एकूण २५ राहिली आहे. आज जे नऊ दगावले आहेत त्यात चिंबल येथील ६६ वर्षीय पुरुष, मेरशी येथील ६६ वर्षीय पुरुष, शिरोडा येथील ८३ वर्षीय पुरुष, फोंडा येथील ४९ वर्षीय पुरुष, करासवाडा येथील ८३ वर्षीय पुरुष, खांडोळा येथील ५४ वर्षीय पुरुष, बेतकी येथील ५२ वर्षीय पुरुष, रावणफोंड येथील ५५ वर्षीय महिला आणि आसगाव येथील ४६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

आज १ हजार ५६० जणांच्या चाचण्या केल्या, त्यात ८५० जणांच्या निगेटिव्ह आणि ३४४ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. ३६६ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. त्याशिवाय ३५९ जण घरगुती आयसोलेशन उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत घरगुती उपचार घेणाऱ्यांची संख्या ७ हजार ६८० वर पोहोचली आहे. 

पणजीत १४ रुग्ण सापडले!

पणजीतील कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्यावर राहत आहे. आज १४ जण पॉझिटिव्ह आढळले असून एकूण रुग्णसंख्या २१६ वर राहिली आहे.
पेडणे तालुक्यातील विविध भागात आज अकरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यात पेडणे - २, केरी - १, तुये - २, आगरवाडा -३, मोप - १, मोरजी - १, धारगळ - १. यातील काही रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले.

दोनशेच्यावर रुग्णसंख्या असलेली आरोग्य केंद्रे 
मडगाव ...४४०
फोंडा .....३१९
पर्वरी ..... २७८
साखळी ...२५६
वास्को .... २२०
पणजी .....२१६
म्हापसा ... २११

संबंधित बातम्या