डॉ. पी. एस. रामाणी फाऊंडेशनचे कार्य उल्लेखनीय: डॉ. अजय पेडणेकर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

डॉ. अजय पेडणेकर यांनी रामाणी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची प्रशंसा करून सामाजिक क्षेत्रात अशाप्रकारचे कार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. कोरोना महामारीच्या काळातही रामाणी फाऊंडेशनतर्फे कोविड विषयावर स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांत जागृती केली असून सर्वांनी कोरोनाप्रती जागरूक रहावे, असे आवाहन केले व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले. 

फोंडा: डॉ. पी. एस. रामाणी फाऊंडेशनतर्फे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही भरीव कार्य केले असून शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित उपक्रमांना विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद उत्साहजनक असल्याचे उद्‌गार इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. अजय पेडणेकर यांनी काढले. 

कुर्टी- फोंडा येथे कामाक्षी शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात आज (रविवारी) डॉ. पी. एस. रामाणी मेडिकल फाऊंडेशनतर्फे अखिल गोवा आंतर महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या कोविडविषयक निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसवितरण कार्यक्रमात डॉ. अजय पेडणेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. वल्लभ धायमोडकर, कामाक्षी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा पी. एस. रामाणी फाऊंडेशनचे क्रियाशील सदस्य विनायक नाईक, कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य परमेश्‍वर भट, प्रा. नामदेव नाईक व पत्रकार नरेंद्र तारी उपस्थित होते. 

डॉ. अजय पेडणेकर यांनी रामाणी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची प्रशंसा करून सामाजिक क्षेत्रात अशाप्रकारचे कार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. कोरोना महामारीच्या काळातही रामाणी फाऊंडेशनतर्फे कोविड विषयावर स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांत जागृती केली असून सर्वांनी कोरोनाप्रती जागरूक रहावे, असे आवाहन केले व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले. 

डॉ. वल्लभ धायमोडकर यांनी डॉ. पी. एस. रामाणी मेडिकल फाऊंडेशनतर्फे आरोग्यविषयक उपक्रम आखले जात असून समाजाप्रती आपले उत्तरदायित्व डॉ. पी. एस. रामाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी टिकवून ठेवले असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांसाठी कोविडसंबंधी निबंध स्पर्धा आयोजित करून कोरोनाप्रती सजगता बाळगण्यासाठी एक चांगला उपक्रम रामाणी मेडिकल फाऊंडेशनने केला असून आपण या मेडिकल फाऊंडेशनच्या कार्यात सहभागी होऊन समाजाप्रती आपली छोटी का होईना पण सेवा बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. 

पत्रकार नरेंद्र तारी यांनीही आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल त्यांनी विजेत्यांचे कौतुक केले. 

दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते, यंदा या स्पर्धेत सचिन गावकर प्रथम, गायत्री कदम द्वितीय, वनाली डायस तृतीयस्थानी आली तर संघवी नाईक, मिनोशा डिकॉस्टा व ज्यूड फर्नांडिस यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाले. सर्वांना रोख बक्षिसासह प्रशस्तीपत्र देण्यात आले.

प्रास्ताविक विनायक नाईक यांनी करून डॉ. पी. एस. रामाणी मेडिकल फाऊंडेशनच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. समाजाप्रती योगदान देण्यासाठी युवा वर्गाने पुढे यावे, असा संदेश अशा उपक्रमातून दिला जात असून त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

प्राचार्य परमेश्‍वर भट यांनी स्वागत करून रामाणी फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रम आयोजित केले जात असून विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन कु. सिद्धी विनायक नाईक हिने केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला खुशी ठाकूर हिने सुरेख गणेशवंदना सादर केली. प्रा. नामदेव नाईक यांनी आभार मानले. कोविडसंबंधी नियम पाळूनच हा कार्यक्रम आखण्यात आला होता.

न्युरोलॉजिकल शिबिर २७ रोजी
डॉ. पी. एस. रामाणी मेडिकल फाऊंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित केले जाणारे न्युरोलॉजिकल शिबिर येत्या रविवारी २७ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत होणार आहे. इच्छुक रुग्णांनी येत्या २६ तारखेपूर्वी ९४२०८१८७४५ या क्रमांकावर नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या