डुंगे-नयबाग मार्गावरील खड्डेमय रस्ते दुरुस्त करा

प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

पेडणे नागरीक समितीचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम कार्यालयास निवेदन

पेडणे:  राष्ट्रीय महामार्गावरील डुंगे-नयबाग येथील उतरणीवर मोठा खड्डा पडलेला असून रस्ता पूर्ण उखडला आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत. यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यासंदर्भातचे निवेदन पेडणे नागरीक समितीतर्फे राजमोहन शेटये यांनी कोलवाळ येथील राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम कार्यालयात दिले. 

यावेळी ॲड. वेंकटेश नाईक, भारत बागकर, ॲड. सीताराम परब व सूर्यकांत चोडणकर उपस्थित होते. या निवेदनासह दै.‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अपघातांची कात्रणेही जोडली आहेत. निवेदनात म्हटले आहे की, डुंगे-नयबाग येथील उतरणीवर यंदाच्या पावसाळ्यात मोठा खड्डा पडला असून मार्ग पूर्णपणे उखडला आहे. मालपेहून येताना बऱ्याच अंतरापर्यंत उतार आहे. जेथे मार्गाला खड्डा पडला आहे त्या ठिकाणी उतरणी व किंचीत वळण आहे. उतरणीवर वाहने वेगात आल्यावर चालकाच्या अचानक लक्षात आल्यावर चालक वाहनाचा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न करतात यात वाहनांचे आतापर्यंत अपघात झालेले आहेत. 
२८ जुलै रोजी अशाच प्रकारे राजस्थानला जाणारा एक मालवाहू ट्र्कचा याठिकाणी अपघात झाला. दुभाजक तोडून सुमारे चाळीस मीटरपर्यंत घसरत जाऊन तो स्थिरावला. यावेळी कुठलेही वाहन मार्गावर नसल्याने मोठा अनर्थ टळला व सुदैवाने चालक व वाहकही बचावले. चतुर्थीच्या काळातही या ठिकाणी अनेक किरकोळ अपघात झाले. महामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केल्यास लोकांना न्यायासाठी अन्य मार्ग स्वीकारावे लागतील, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या