'गोवा मुक्ती संग्रामाला' कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या घटना

Goa Republic day 2020 Goa Liberation day 2020 60th Goa Liberation day celebration
Goa Republic day 2020 Goa Liberation day 2020 60th Goa Liberation day celebration

गोमंतकीयांचा विरोध


पोर्तुगीजांच्या राजवटीला गोमंतकियांनी अगदी सुरवातीपासून कडाडून विरोध केला. १९४३ साली कुंकळ्ळीच्या बंडा अगोदर पोर्तुगीजांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न म्हाळू पै वेर्णेकर यांनी केला. चोडण - दिवाडी या बेटांवरील रयतेने शेतजमिनी पिकवण्यास इन्कार केला.

कुंकळ्ळीचे बंड 
सासष्टी तालुक्‍यातील कुंकळ्ळी, असोळणे, वेळ्ळीच्या गावकऱ्यांनी पोर्तुगीज दडपशाही झुगारली. त्यांच्या धार्मिक आणि वंशभेदी धोरणाविरुद्ध बंड केले. जबरदस्ती व जुलुमांनी धार्मिक छळ करण्याच्या विरोधात कुंकळ्ळीच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन पोर्तुगीज साम्राज्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला.


 १६५४ माथाइस कास्त्रुचे बंड


माथाईस कास्त्रु महाले या दिवारमध्ये जन्मलेल्या स्थानिक पाद्र्याने आदिलशहाच्या मदतीने व गोमंतकीय जनतेच्या सहकाराने गोवा स्वतंत्र करण्याच्या मनसुबा रचला होता. पण, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पिंटोचे बंडसुद्धा यशस्वी झाले नाही.


 राण्यांची बंडे


सत्तरीच्या राणे सरदारांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध वेळोवेळी बंड उभारले. यांना राण्यांची बंडे असे म्हणतात. लढाऊ वृत्तीच्या या लोकांनी पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडले. दीपाजी राणे यांचे बंड फारच गाजले. त्यांनी पोर्तुगीजांना पळताभुई थोडी केली. १९१२ पर्यंत राणे लढतच होते, पण ही बंडेसुद्धा चिरडली गेली. 


 १८ जून १९४६


१८ जून १९४६ रोजी. डॉ. राम मनोहर लोहिया यांनी नागरिक स्वातंत्र्यासाठी गोव्यात क्रांतीची ज्योत पेटवली. जयहिंद चळवळीने यश दैनिक सत्याग्रहाच्या माध्यमातून नागरीक स्वातंत्र्य दडपणाऱ्या सालाझार शाहीला आव्हान दिले. लक्ष्मीकांत भेंब्रे, डॉ. राम हेगडे, अॅड. पांडुरंग शिरोडकर, नीळकंठ कारापुरकर, गिलरेपो तिकलो, पुरुषोत्तम काकोडकर यांना भल्यामोठ्या शिक्षा सुनावण्यात आल्या. काहींना पोर्तुगालमध्ये तर काहींना सांगोला, मोझांबिक या आफ्रिकेतील वसाहतीमध्ये तुरुंगात ठेवले.


 सशस्त्र क्रांती


सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून आझाद गोमंतकाची स्थापना केली गेली. विश्‍वनाथ लवंदे, मोहन रानडे व इतरांनी पोर्तुगिजांना वठणीवर आणण्यासाठी पोलिस चौकीवर लष्करी केंद्रावर, सरकारी आस्थापनांवर हल्ले चढवले.


 १५ ऑगस्ट १९५४-  सत्याग्रह


१९५४ साली सत्याग्रह मार्गाने १९ ऑगस्ट रोजी पत्रादेवी, बांदा व पोळे येथे सत्याग्रह केले. अँथनी डिसोझा, अल्फ्रेड आफोन्स, मार्क फर्नांडिस यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. त्यांच्यासमवेत शेकडो तरुणांनी सत्याग्रहात भाग घेतला.


 १५ ऑगस्ट १९५५-  सामूहिक सत्याग्रह


गोवे विमोचन सहाय्यक समितीतर्फे सामुदायिक चळवळीचे नवीन पर्व सुरू झाले. ना. ग. गोरे, शिरुभाऊ लिमये, हिरवे गुरुजी, मधू लिमये यांनी गोव्यात प्रवेश केला. १९ ऑगस्ट १९५५ ला सामुदायिक सत्याग्रह केले गेले. संबंध भारताच्या कानाकोपऱ्यात भारताचा लढा बनला. राष्ट्रीय एकात्मतेचे शिखर गाठले गेले. 


 लष्करी कारवाई १९ डिसेंबर १९६१ 


पारतंत्र्यात असलेल्या गोव्याबद्दल भारत सरकार सहानुभूती ठेवून होते. गोव्याचा प्रश्‍न वाटाघाटीने व शांततापूर्ण मार्गाने सुटावा, असे पंडित नेहरूंना वाटत होते. तसे प्रयत्नही सरकारतर्फे होत होते, पण पोर्तुगीजांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे शक्‍य झाले नाही आणि संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी अखेर भारतीय सैन्याला गोव्याकडे कूच करण्याचा आदेश दिला. भारतीय सैन्याने शौर्य आणि धैर्याचा वसा जपत गोव्याला पारतंत्र्यातून मुक्त केले.

सेनापथके सीमेवर धडकली आणि...


गोवा मुक्तिदिन आज साजरा करत आहोत. भारतमाता जरी स्वतंत्र झाली तरी आपला हा छोटा गोवा ४५० वर्षाच्या प्रदीर्घ पारतंत्र्यातून अजून मुक्त झाला नव्हता. १७ डिसेंबर १९६१ च्या मध्यरात्री भारतीय सेनापथके गोव्याच्या सीमेवर येऊन धडकली. हळूहळू सेना पुढे सरकत गोव्याच्या हद्दीत शिरली. गोव्याला जो पारतंत्र्याचा शाप लागला होता तो पुसून टाकण्याचा काळ उंबरठ्यावर येऊन थबकला होता. जसजशी भारतीय सेना पुढे येत होती, तशी भारतीय सेना पुढे येऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी पिछेहाटीचे धोरण स्वीकारलं. भारतीय सेवा पुढे येऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी पूल उडविले. परंतु त्यानंतर अवघ्या काही तासांत पणजीमध्ये भारताचा तिरंगा भारतीय सेनेने डौलात फडकविला. तो सुवर्ण दिवस होता ‘१९ डिसेंबर १९६१’. ही मुक्ती सुखासुखी मिळाली नव्हती. अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण या भूमीसाठी अर्पण केले. १९४४च्या १४ ऑगस्टला हजारो भारतीय स्वयंसेवकांनी गोव्याच्या सीमा ओलांडल्या. त्यातील कित्येक सैनिकांना वीरमरण आले. या स्वातंत्र्यविरांसाठी ह्या पवित्र भूमीच्या स्वातंत्र्यासाठी मरणे म्हणजेच जगणे होते. म्हणून तर ते अमर हुतात्मे झाले.
 

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com