IFFI 2022 Updates: 'महिलांवरील ‘फाटाफाटी’ लवकरच झळकणार' - ऋताभरी चक्रवर्ती

IFFI 2022 Updates: ऋताभरी माझ्या हृदयातील चित्रपट; अबीर चटर्जी मुख्‍य भूमिकेत
Ritabhari Chakraborty |Goa News
Ritabhari Chakraborty |Goa News Dainik Gomantak

Ritabhari Chakraborty: वयाच्या 15व्या वर्षापासून मी चित्रपट क्षेत्रात वावरत आहे. मॉडेलिंग आणि टीव्ही कलाकार म्हणून माझ्या करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर अनेक बंगाली टीव्ही मालिका आणि चित्रपटांत काम केले.

टीव्ही आणि सिनेसृष्टीतील रसिकांनी दिलेली दाद आणि भरभरून दिलेले प्रेमच मला यशाची एकेक पायरी पार करण्यास सहाय्यभूत ठरले. रसिकांच्या या प्रेमापोटीच आता मी माझ्या हृदयातील ‘फाटाफाटी’ या चित्रपटात काम करत आहे. येत्या मार्चमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी अबीर चटर्जी यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आहे.

अरित्रा मुखर्जी दिग्‍दर्शित ‘फाटाफाटी’ हा चित्रपट माझ्या हृदयातील असे मी म्हटले ते अशासाठी, की हा चित्रपट महिलांवर आधारित आहे. महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या या चित्रपटातील माझी भूमिकाही या चित्रपटाला नक्कीच न्याय मिळवून देईल, असा विश्वास प्रख्यात बंगाली अभिनेत्री, गायिका, नृत्यांगना ऋताभरी चक्रवर्ती यांनी व्‍यक्त केला.

अवास्तविक सौंदर्य मानकांच्या कल्पनेचा पुरस्कार करणाऱ्या सध्याच्या युगात एका अधिक-आकाराच्या (प्लस-साईज) मॉडेलच्या जीवन प्रवासाचा आणि यशस्वीतेचा मागोवा घेणारा हा चित्रपट आहे.

फॅशन आणि मॉडेलिंगमध्ये करिअर करू पाहणाऱ्या महिलांवरील हा चित्रपट नक्कीच रसिकांच्या पसंतीस उतरेल. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण झाले असून मार्चमध्ये महिलादिनी हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येईल, अशी माहिती ‘फाटाफाटी’ या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका करणाऱ्या ऋताभरी चक्रवर्ती हिने दिली.

‘ब्रह्मा जानेन गोपोन कोमोटी’ हा चित्रपट बंगालमध्ये बराच गाजला. वादग्रस्त विषयाला हात घातल्याने काहीप्रमाणात या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोधही झाला. याविषयी ऋताभरी म्हणाली, पुरुषांनीच पुरोहित व्हायचे असे कोणत्याही वेद, पुराणात लिहून ठेवलेले नाही. मग महिला पुरोहिताला विरोध का केला जातो.

यासंदर्भात समाजाचे डोळे उघडण्यासाठीच या चित्रपटाची निर्मिती केली गेली. जुन्या चालीरिती, रुढी, परंपरा डोक्यावर घेऊन चालणाऱ्या समाजाला हा चित्रपट म्हणजे एक नाजूक विषय होता. पण चित्रपट गाजला, त्यातील माझी भूमिकाही प्रेक्षकांनी उचलून धरली. गेल्या वर्षी जानेवारीत माझा ‘परी’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला.

अनुष्का शर्मा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात मला अनुष्का शर्मा हिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

Ritabhari Chakraborty |Goa News
IFFI Goa Film Bazar: 'फिल्म बाजार' मध्ये होणार तब्बल 800 चित्रपटांची देवाणघेवाण

इफ्फी आयोजकांचे खूप खूप आभार

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‍घाटन सोहळ्यात रविवारी मी नृत्यकला सादर केली. यावेळी झालेला जल्लोष आणि टाळ्यांच्या कडकडाटासह उपस्थितांनी दाद दिली. या कार्यक्रमात माझ्यासह सर्व कलाकारांनी उत्कृष्ट कलेचे सादरीकरण केले.

गेल्या वर्षीच्या इफ्फीच्या उद्‍घाटन सोहळ्यातही मी नृत्य सादर केले होते. सतत दोनवेळा इफ्फीच्या उद्‍घाटन सोहळ्यात नृत्यकला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी इफ्फीच्या आयोजकांचे आभार मानते, असे ऋताभरी चटर्जी हिने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com