राज्यात रस्ता अपघातात ३३ टक्क्यांनी घट; वाहनांची वर्दळ कमी असूनही १४५ जणांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

बंद असलेला टॅक्सी व्यवसाय व पर्यटकांना राज्यात प्रवेश बंद असल्याने वाहनांची वर्दळ कमी झाल्यानेच हे प्रमाण घटले आहे. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी असूनही गेल्या आठ महिन्यात प्रतिमाह रस्ता अपघातात १८ जणांचा बळी गेला आहे.

पणजी: राज्यात ‘कोविड - १९’च्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत गेल्या आठ महिन्यात १५२२ रस्ता अपघातांची नोंद झाली. हे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत ३३.४२ टक्क्यांनी कमी आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या १४५ झाली,  तरी त्याचेही प्रमाण २४ टक्क्यांनी घटले आहे. बंद असलेला टॅक्सी व्यवसाय व पर्यटकांना राज्यात प्रवेश बंद असल्याने वाहनांची वर्दळ कमी झाल्यानेच हे प्रमाण घटले आहे. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी असूनही गेल्या आठ महिन्यात प्रतिमाह रस्ता अपघातात १८ जणांचा बळी गेला आहे.

वाहतूक पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी ७६४ अपघात व भीषण अपघातांचे प्रमाणही २२.४७ टक्क्यांनी कमी झाले आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०१९ मध्ये १९१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये ११० दुचाकी चालक व २१ सहचालकांचा समावेश होता. यावर्षी १४५ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये ८८ चालक व ११ सहचालकांचा समावेश आहे. हे प्रमाण कमी असले तरी एकूण मृत्यूमधील दुचाकी अपघातातील प्रमाण अधिक आहे. 

किरकोळ अपघातांची १०१४ नोंद झाली आहे व जखमी झालेल्यांची संख्या ४३७ आहे ती गेल्यावर्षीपेक्षा अर्ध्या पटीने आहे. मोटार वाहन कायद्याखाली नियमांचे पालन केलेल्यांविरुद्ध ५ लाख ४९ हजार ९३१ चलन्स देऊन ६ कोटी ३६ लाख ३९ हजार ९५० दंड वसूल करण्यात आला आहे. ही दंडात्मक कारवाईची वसुली गेल्यावर्षीपेक्षा ६.८८ टक्क्यांनी कमी झाली आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या