संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद करणार नाही

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी कोणती मदत हवी आहे याचा आढावा घेण्यात आला. साखर कारखाना बंद केला जाणार नाही. मात्र, तो सरकार चालवेल की कोणाला चालवण्यास देईल याचा निर्णय व्हायचा आहे.

पणजी: धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना सरकार बंद करणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे स्पष्ट केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्‍या शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी कोणती मदत हवी आहे याचा आढावा घेण्यात आला. साखर कारखाना बंद केला जाणार नाही. मात्र, तो सरकार चालवेल की कोणाला चालवण्यास देईल याचा निर्णय व्हायचा आहे. साखर कारखाना सुरू होईपर्यंत ऊस सरकार घेणार आहे. त्यासाठीच्या दराबाबतही आज चर्चा झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळतच राहणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस लागवडीच्या बदल्यात किती मदत द्यावी त्याबाबत ठरवण्यात येत आहे. त्यासाठी आणखी बैठक घेण्यात येईल.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोटा होऊ दिला जाणार नाही. हा कारखाना सहकार खात्याकडून कृषी खात्याकडे वर्ग केला जाणार आहे. काहींनी हा कारखाना चालवण्यात रस दाखवला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून यासाठी भरीव मदत मिळू शकते. त्या शक्यतेवर विचार सुरू आहे. यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतले होते. आजची बैठक ही सविस्तर चर्चेसाठी होती. आजच्या बैठकीत साखर कारखाना बंद केला जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, साखर कारखाना बंद केला जाणार नाही.  त्याबाबत मुख्यमंत्रीच तपशीलाने सांगू शकतील.

कारखाना खासगी कंपनीकडे देण्यास शेतकऱ्यांची ना हरकत
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले, की आमचे सरकारकडून येणे असलेले पैसे लवकर मिळतील. यापूर्वीच्या मंत्र्याने कारखाना बंद करू असे सांगितले होते. तो मंत्री आजच्या बैठकीला नव्हता. खासगी कंपनीकडेही हा कारखाना देण्यास शेतकऱ्यांची हरकत नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या