चिकोळणा, सांकवाळच्या उपसरपंचपदी महाले, वारीस बिनविरोध

वार्ताहर
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

चिकोळणा- बोगमाळो पंचायतीच्या उपसरपंचपदी संकल्प महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या बुधवारी (दि.९) रोजी बोलावण्यात आलेली बैठक एका सदस्याला कोरोनाची बाधा झाल्याने रद्द करण्यात आली होती.

दाबोळी: चिकोळणा- बोगमाळो पंचायतीच्या उपसरपंचपदी संकल्प महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या बुधवारी (दि.९) रोजी बोलावण्यात आलेली बैठक एका सदस्याला कोरोनाची बाधा झाल्याने रद्द करण्यात आली होती. ती बैठक आज ( दि. २४) रोजी घेण्यात आली. तर सांकवाळ पंचायतीच्या उपसरपंचपदी सुकोरीना वारीस यांची बिनविरोध निवड झाली.

चिकोळणा- बोगमाळोचे उपसरपंच अरुण नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसरपंच निवडीसाठी पंचायत संचालनालयातर्फे नोटीस जारी करून बुधवार दि.९  सप्टेंबर रोजी बैठक घेण्याचा आदेश जारी केला होता. मात्र यापूर्वी पंचायतीच्या सचिवांनी मुरगाव गटविकास कार्यालयाला पत्र लिहून येथील एका पंच सदस्याला कोरोनाची बाधा झाल्याचे कळवले व ही बैठक रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुरगाव गटविकास कार्यालयाने ही बैठक रद्द करून याबाबत पंचायत संचालकांना माहिती दिली होती. तदनंतर पंचायत संचालकांनी रद्द झालेली बैठक आज  घेण्याचा निर्णय घेऊन बैठक संपन्न झाली. 

दरम्यान उपसरपंचपदासाठी आज गुरुवारी पंचायत मंडळाची बैठक होऊन निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत संकल्प महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीला मुरगाव गटविकास कार्यालयातील मुख्य कारकून (हेडक्लार्क) विनोद गोसावी यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले. उपसरपंच पदाच्या दावेदारीसाठी अर्ज भरण्याच्या वेळेत संकल्प महाले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निर्वाचन अधिकारी यांनी घोषित केले. पंचायत सचिव आशा मेहता यांनी निवडणुकीला सहकार्य केले. बैठकीला पंचायतीच्या पंचायत सदस्य पैकी सहा पंचायत सदस्य हजर होते. पंच सदस्य क्लावडीयो डीक्रूज बैठकीला गैरहजर राहिले.

दरम्यान सांकवाळ पंचायतीच्या उपसरपंचपदी सुकोरीना वालीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरुवार दि.१० सप्टेंबर रोजी साकवाळ पंचायतीच्या सरपंचपदी रमाकांत बोरकर यांची वर्णी लागल्यानंतर लगेच पंचायत सदस्यांनी उपसरपंच कविता कमाल यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उपसरपंच कविता कमल यांनी आपल्या पदाचा लगेच राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद खाली होते. आज झालेल्या बैठकीत सुकोरिना वालीस यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीला निक्लोस कार्दोज यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले.
 

संबंधित बातम्या