हर्षद देवारी: वास्कोतील कोळसा प्रदूषण आता फोंड्यात!

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

गोवा सुरक्षा मंचचा विरोध, बोरीत जेटी उभारण्याच्या हालचाली

फोंडा:   वास्कोतील कोळशाची काळी भुकटी फोंड्यात पसरवण्याचा सरकारचा डाव असून फोंड्यातून कोळशाची वाहतूक करण्यास गोवा सुरक्षा मंचने तीव्र विरोध केला आहे. 

गोवा सुरक्षा मंचचे फोंडा प्रमुख हर्षद देवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वास्कोत कोळसा प्रदूषणामुळे तेथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आता हीच समस्या फोंडा भागातही उद्‌भवणार असून बोरी येथे जेटी उभारून तेथून कोळशाची वाहतूक करण्याचा सरकारचा डाव असून सर्वांनी त्यासाठी संघटीत होऊन सरकारचा हा डाव हाणून पाडला पाहिजे, असे हर्षद देवारी म्हणाले. गोवा सुरक्षा मंचचा याप्रकरणी स्थानिकांना पाठिंबा असल्याचे देवारी म्हणाले.

वास्कोत कोळसा वाहतुकीमुळे तीव्र प्रदूषण होत असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या प्रदूषणाविरोधात अनेक आंदोलने झाली. 
या आंदोलनात बऱ्याच संघटनांनी भाग घेतला. मात्र सत्तेत आल्यानंतर याच लोकांनी घुमजाव केले असून आता ही कोळसा वाहतूक फोंडा भागात करण्याचे घाटत आहे. बारजे - बोरी येथे या कोळसा वाहतुकीसाठी जेटी उभारण्यात येणार असून फेरीधक्का बांधण्यासाठी म्हणून सरकारने ही जागा ताब्यात घेतली असली तरी आता या जागेवर मोठ्या जेटीचे नियोजन चालले आहे. बोरी पुलाला समांतर मोठा पूल उभारण्यात येत असून या पुलावरून बिनदिक्कतपणे कोळसा वाहतूक केली जाणार आहे. या कोळसा वाहतुकीमुळे फोंड्यातील बोरी, शिरोडा, रासई तसेच अन्य गावे कोळसा प्रदूषणाच्या विळख्यात सापडणार असून आताच लोकांनी जागे व्हावे, अन्यथा कोळसा प्रदूषणाला सामोरे जावे लागणार असल्याचे गोवा सुरक्षा मंचने म्हटले आहे.

संबंधित बातम्या