"सरकारच्या कारनाम्यांचा बुरखा पाडण्याचे काम आम्ही इमाने इतबारे करू"

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

लोकायुक्त कायदा कमकुवत करुन भ्रष्टाचार करण्यास रान मोकळे व्हावे, तसेच या आधी झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये,

पणजी: लोकायुक्त कायदा कमकुवत करुन भ्रष्टाचार करण्यास रान मोकळे व्हावे, तसेच या आधी झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी भाजप सरकारचे जे उद्योग चालवले आहेत, ते त्वरित थांबवावेत, अन्यथा गोवा सुरक्षा मंचही याविरूध्द दंड थोपटून उभा राहील, असा इशारा गोसुमंचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी सरकारला दिला.

माजी लोकायुक्त मिश्रा यांनी एकंदर 23 प्रकरणात सरकारमधील मंत्री व आमदार यांच्यावर आरोप केले होते. किंबहूना ताशेरे ओढले होते. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यावर आरोप होते. मिश्रा यांनी दिलेल्या अहवालानुसार कारवाई केली असती तर विद्यमान भाजपचे अर्धेअधिक मंत्री, आमदार घरी बसले असते. काही माजी आमदारही अडचणीत आले असते. 

लोकायुक्त कायद्याच्या दुरुस्तीस काँग्रेस विरोध करणार - दिगंबर कामत

यामुळे भाजप सरकारने लोकायुक्त कायद्यात अशा काही दुरूस्त्या सुचवल्या की लोकायुक्त कायदा कुचकामी होईल. त्यामुळे निवडणुकीत ही त्रास होणार नाही, आणि पुढे भ्रष्टाचार करण्यास रान मोकळे होईल. हे सर्व कायद्याला धरून नाही, सरकारने पुर्ण विचारांती निर्णय घ्यावा, असे फळदेसाई म्हणाले. निवडणुकीत सरकारच्या सर्व कारनाम्यांचा बुरखा पाडण्याचे काम आम्ही इमाने इतबारे पार पाडू असाही इशारा द्यायला फळदेसाई विसरले नाहीत.

संबंधित बातम्या