गोवा ठरतंय 'आयपीएल' सट्टेबाजीचं केंद्र..!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

गेल्या एका महिन्यातील गोवा पोलिसांनी सट्टेबाजीप्रकरणी घातलेला हा पाचवा छापा आहे. त्यामुळे गोवा हे आयपीएल सट्टेबाजीचे केंद्र बनल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.  

पणजी - परदेशात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवरील सट्टेबाजीप्रकरणी क्राईम ब्रँच पोलिसांनी ताळगाव येथील एका फ्लॅटवर छापा टाकून छत्तीसगढच्या चारजणांना अटक केली. गेल्या एका महिन्यातील गोवा पोलिसांनी सट्टेबाजीप्रकरणी घातलेला हा पाचवा छापा आहे. त्यामुळे गोवा हे आयपीएल सट्टेबाजीचे केंद्र बनल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.  

ताळगाव येथील छाप्यात अटक केलेल्यांची नावे रणजोत सिंग छाब्रा, सुनील मोटवानी, कपिल तोलानी व विनय गंगवाणी अशी असून हे सर्वजण रायपूर - छत्तीसगढ येथील आहेत. या छाप्यावेळी त्यांच्याकडून अनेक मोबाईल्स तसेच एका लॅपटॉपसह इतर सॉफ्टवेअर सामग्री मिळून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आयपीएल सामन्यांवर या संशयितांनी सुमारे ५० लाखांची सट्टेबाजी घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आयपीएल सुरू झाल्यापासून ते गोव्यातून सट्टेबाजी करीत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. ते सट्टेबाजी देशात तसचे परदेशातून मोबाईल फोनवर स्वीकारत होते. कळंगुट पोलिसांनी तीन तर क्राईम ब्रँच पोलिसांनी दोन प्रकरणे नोंद केली आहेत. गोव्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय सट्टेबाजीसाठी वास्तव्य करून असल्याचा संशय पोलिसांना आहे.
 

संबंधित बातम्या