दरड कोसळून महिला ठार; वाडे - वास्‍कोतील दुर्घटना

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

रविवारी रात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी दिवसा व रात्रीही कायम होता. त्‍यामुळे वास्को शहराबरोबर इतर भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. जनजीवन विस्कळीत झाले होते.

दाबोळी: रविवारपासून पडलेल्‍या संततधार पावसाच्‍या तडाख्यात वाडे वास्को गोवा शिपयार्डसमोरील डोंगर माथ्यावरील मोठी दरड एका घरावर कोसळून अनिता बोरकर (६३ वर्षे) या महिलेचा मोठ्या दगडाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री १०.३० वा.च्या दरम्यान घडली. दरड कोसळल्‍यानंतर शेजाऱ्यांनी त्‍वरित धाव घेऊन मुलाला सहीसलामत बाहेर काढले. पण, अनिता या मोठ्या दगडाखाली चिरडल्याने त्‍यांना वाचवता आले नाही.

रविवारी रात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी दिवसा व रात्रीही कायम होता. त्‍यामुळे वास्को शहराबरोबर इतर भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाने सायंकाळी थोडी वेळ पावसाने उसंत घेतल्यानंतर रात्री ७ वाजल्यापासून पुन्‍हा जोरदार हजेरी लावली. याच दरम्यान रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वाडे वास्को येथे डोंगराळ पायथ्याशी असलेल्या एका घरावर एक भला मोठा दगड मातीसहीत कोसळला आणि बोरकर कुटुंबियांसह स्‍थानिकांची तारांबळ उडाली. 

पाच तासांच्‍या प्रयत्‍नानंतर दगड हटवला
दरड कोसळल्‍याची माहिती मिळताच वास्को अग्‍निशामक दलाने त्‍वरित घटनास्‍थळी धाव घेतली व मदतकार्यास सुरवात केली. दगड मोठा असल्याने व काळोख असल्‍याने मदत कार्यात अग्‍निशामक दलास अडथळे येत होते. दलाचे आठ जवान, तीन अधिकारी, तसेच मुरगाव पालिकेचे कर्मचारी कार्यरत होते. सलग पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर भला मोठा दगड कापून अनिता यांना मृतावस्थेत बाहेर काढण्‍यात आले. यावेळी आपत्‍कालीन व्यवस्थापन समिती, वास्को मामलेदार कार्यालयीन तलाठी हनुमंत मांद्रेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक सर्वेश सावंत हेसुद्धा घटनास्थळी उपस्थित होते. वाडे कोसळलेल्या घराची पाहणी मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, मुरगावचे मामलेदार साईश नाईक यांनी केली.

आणखी दरड कोसळण्‍याची शक्‍यता?
या डोंगर पायथ्याशी अनेक घरे असून गेली चार वर्षे या भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. याविषयी येथील नागरिकांनी आपत्‍कालीन व्यवस्थापन, उपजिल्‍हाधिकारी तक्रार केली होती. मात्र, त्‍यावर कोणतीच उपाययोजना केली नसल्‍याचे सांगण्‍यात आले. दोन वर्षांपूर्वी याच भागातील दरड कोसळून एक भलामोठा दगड भिकारो नाईक यांच्या घरावर स्थिरावला होता. तर या ठिकाणी तात्पुरते लोखंडी रेलिंग घालण्यात आले होते. काल रात्रीची घटना या रेलिंगच्या बाजूलाच घडली. तेथे कायमस्वरुपी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अंत्‍यसंस्‍कार
दरड कोसळून मृत्‍यूमुखी पडलेल्‍या अनिता बोरकर यांच्‍या मृतदेहावर मडगाव हॉस्पिसियो इस्पितळात शवचिकित्सा केली व मृतदेह कुटुंबियाच्‍या स्वाधीन करण्यात आला. मंगळवारी दुपारी वास्को खारवाडा हिंदू स्माशानभूमीत त्‍यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले. अनिता यांनी मुलीचे लग्न केल्यानंतर त्‍या व यांचा मुलगा अजित हे घरात राहत होते. घरावर दगड कोसळून संपूर्ण घर मोडल्याने सध्या अजित यांच्‍यासमोर निवाऱ्याचा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. सध्‍या शेजाऱ्यांनी त्याची राहण्‍याची सोय केली आहे.

महाकाय दगड घरात घुसला!
संततधार पावसामुळे डोंगरावरील माती भुसभुशीत झाली व दगड मातीसह घराच्‍या दिशेने उतरणीवरून आला आणि थेट भिंतीवर आदळून घरात घुसला. रात्रीच्‍यावेळी दुर्घटना घडल्‍याने क्षणभर काय झाले, हे बोरकर कुटुंबियांना समजलेच नाही. मोठा दगड भिंत पाडून घरात विसवल्‍याने सर्वांचा थरकाप उडाला व भीतीने सर्वजण घराबाहेर पडले. मात्र, या भल्या मोठ्या दगडाखाली अनिता बोरकर (६३) सापडल्‍या. मदतीसाठी प्रयत्‍न केले, तरीही दगड जागचा हलत नव्‍हता. मदतकार्यास वेळ झाला व अनिता यांना बाहेरही पडता येत नसल्‍याने त्‍या जागीच गतप्राण झाल्‍या. कुटुंबाच्‍या डोळ्यांदेखीत हा प्रकार घडला. स्‍थानिकांनीही हळहळ व्‍यक्‍त केली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या