गोवा मुक्तिसंग्रामाच्या हीरक महोत्‍सवी वर्षासाठी गोवा सज्ज : राष्‍ट्रपतींच्‍या आगमनाची तयारी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

गोवा मुक्तिदिनाच्या षष्ठ्यब्दी सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाची पूर्ण तयारी होत आली आहे. गोमंतकिय त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

पणजी :  गोवा मुक्तिदिनाच्या षष्ठ्यब्दी सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाची पूर्ण तयारी होत आली आहे. गोमंतकिय त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. या सोहळ्यावेळी गोव्याचा मुक्तिसंग्राम तसेच कला व संस्कृतीचा समावेश असलेला भरगच्च कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण स्थानिक चित्रवाहिनीवरून केले जाणार आहे. राजधानी पणजीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तसेच रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. सरकारी यंत्रणा गतिमान झाली असून पोलिस सुरक्षा व्यवस्था तसेच राष्ट्रपतींच्या वाहन ताफ्याची तालीमही घेण्यात येत आहेत. सोहळ्याच्या दिवशी पणजीत वाहतूक मार्गबदल करण्यात आला आहे.

 

असा असेल कार्यक्रम

आल्तिनो - पणजी येथील शासकीय निवासस्थानी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राष्ट्रपतींचा गोव्यातील कार्यक्रम यासंदर्भात माहिती दिली. गोवा मुक्तिदिन ध्वजारोहण सोहळा नेहमीप्रमाणे सकाळी होईल. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राष्‍ट्रपतींचे दाबोळी विमानतळावर आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने गोवा विद्यापीठ येथील हेलिपॅडवर उतरतील व राजभवनावर रस्ता मार्गाने रवाना होतील. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ते तेथे असतील. संध्याकाळी ५.४० वाजता ते आझाद मैदानावरील गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर ते कांपाल येथील मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींची उपस्थिती असणारा २० डिसेंबरला कोणताही सरकारी कार्यक्रम नसून ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. या दिवशी संध्याकाळी ५.३० वा. ते गोवा विद्यापीठ हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने दाबोळी विमानतळावर जातील व तेथून ते दिल्लीला रवाना होतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. 

 

मुक्तिदिन षष्‍ट्यब्‍दी बोधचिन्‍हाचे अनावरण

गोवा मुक्तिदिन षष्ठ्यब्दी कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव संजीव कुमार व संचालक सुधीर केरकर हे उपस्थित होते. गोवा मुक्तिदनी ते पहिल्यांदाच उपस्थित राहणार असल्याने त्यांचे गोव्यावर आधारित ‘भांगराळे गोंय’ या संस्थेने तयार केलेल्या कोकणी गीताने स्वागत केले जाणार आहे. यावेळी गोव्यातील मुक्तिसंग्राम व त्याचा पूर्वेतिहास तसेच कला व संस्कृती यासंदर्भातचा १० मिनिटांचा माहितीपट दाखविला जाणार आहे. त्यानंतर व्यासपीठावर माझ्यासह राज्यपाल व राष्ट्रपतींची गोमंतकियांना संबोधन करणारी भाषणे होतील. त्यानंतर पंधरा मिनिटे ‘ब्रेक’ घेतल्यानंतर राष्ट्रपती प्रेक्षकांबरोबर बसून पुढील पाऊण तासाचा कार्यक्रम पाहणार आहेत. ‘गोंयचो गाज’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सर्व तालुक्यांमधून सुमारे १२ पथके गोव्याच्या कला व संस्कृती या कार्यक्रमातून घडविणार आहेत. यामध्ये सर्व धर्मीय तसेच समाजाचे गोमंतकीय सामील होणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राजभवनावर वास्तव्य असेल, असे सावंत यांनी सांगितले. 

बोधचिन्हासाठी १६४ प्रवेशिका 

राज्यात वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी माहिती व प्रसिद्ध कात्याने बोधचिन्ह मागवण्यात आले होते. सुमारे १६४ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील तीन निवडण्यात आल्या. या तीनपैकी वेलिंग - म्हार्दोळ येथील भावेश वेलिंगकर यांचे बोधचिन्ह निवडण्यात आले. त्यासाठी सरकारतर्फे दहा हजार रुपयांचे बक्षिसही देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. तालीममुळे वाहतुकीची कोंडी राष्ट्रपतींच्या वाहनांच्या ताफ्यासंदर्भातची तालीम आज संध्याकाळपासून पणजीत सुरू झाली आहे. दोनापावल ते आझाद मैदानपर्यंतचा रस्ता व तेथे पोलिसांची सुरक्षा व्यवस्था याची रचना तयार करण्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच सरकारी अधिकारी रात्री उशिरापर्यंत उपस्‍थित होते. या तालीममुळे पणजीतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाली. वाहन चालकांना हा काय प्रकार आहे याचा पत्ताच नसल्याने वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. 

 

राजधानी पणजीला पोलिस छावणी 

राष्ट्रपतींच्या गोवा भेटीमुळे पणजीत पोलिस सुरक्षा छावणीचे स्वरुप निर्माण झाले आहे. आझाद मैदान तसेच कांपाल येथील परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. १९ व २० डिसेंबरला पणजीतील काही मार्ग बंद करून वाहतूक वळविण्यात येणार आहे. आझाद मैदानाच्या सभोवतीच्या रस्त्यावरील वाहतूक १९ डिसेंबरला दुपारपासून बंद केली जाणार आहे. कांपाल ते दोना पावल येथील मार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे.

 

विद्युत रोषणाईचा झगमगाट 

गोवा मुक्तिदिन तसेच राष्ट्रपतींच्या गोव्यातील भेटीमुळे राजधानी पणजीत मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली आहे. ठिकाठिकाणी झाडांवर तसेच सरकारी कार्यालयांवरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे पणजी शहर विद्युत रोषणाईने उजळले आहे. रस्त्यांची सफाईही सकाळ - संध्याकाळ सुरू आहे. त्यामुळे आझाद मैदान ते दोनापावल व्हाया मिरामार या रस्ता उजळून निघाला आहे. 

 

अधिक वाचा :

निदान गोव्याचा इतिहास नीट शिकवला तरी पुरे... 

नववर्ष स्वागतानिमित्त गोव्यातून होणाऱ्या दारूची होणार सरप्राईज तपासणी

गोवा मुक्तिदिनी राष्ट्रपतींनी पंडित नेहरूंच्या योगदानाचा बहुमान करण्याची दक्षिणायनची मागणी

 

संबंधित बातम्या