गोवा शिगमोत्सवाची तारीख जाहीर; पणजीतून होणार सुरुवात

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

गोवा राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा फक्त पणजी, म्हापसा व फोंडा या तीनच ठिकाणी शिगमोत्सव मिरवणूक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पणजी: गोवा राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा फक्त पणजी, म्हापसा व फोंडा या तीनच ठिकाणी शिगमोत्सव मिरवणूक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शिगमोत्सव समितीची बैठक आज पर्यटन भवनमध्ये झाली. या शिगमोत्सवाला पणजीतून 3 एप्रिल रोजी सुरुवात होईल. म्हापसा येथे 4 एप्रिल तर फोंड्याची तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर होणार आहे. 

पर्यटनमंत्री आजगावकर यांनी घेतलेल्या या समितीच्या बैठकीला पर्यटन संचालक मिनिनो डिसोझा, पणजीचे महापौर उदय मडकईकर, वाहतूक पोलिस अधीक्षक अरविंद गावस, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, पणजीचे माजी नगरसेवक मंगलदास नाईक, पर्यटन विकास महामंडळाचे निखिल देसाई तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी शिगमोत्सव मिरवणुकीसाठीच्या मार्गासंदर्भात तसेच वाहतूक व्यवस्थेबाबतचा आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली. शिगमोत्सव हा पारंपरिक महोत्सव असल्याने कोरोनाच्या महामारीमुळे तो प्रत्येक शहरामध्ये न घेता तीनच ठिकाणी घेण्यात येत असल्याचे मंत्री आजगावकर यांनी स्पष्ट केले. या महोत्सवासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या बक्षिसांची माहिती त्यांनी दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार शिगमोत्सव दोन जिल्ह्यातील एका शहरात आयोजित करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उत्तरेत म्हापशात तर दक्षिणेत फोंडा ही ठिकाणी निश्‍चित झाली होती. पणजीत शिगमोत्सव होणार नसल्याने पणजी शिगमोत्सव समितीने पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्याशी चर्चा केली व राजधानी पणजीत हा शिगमोत्सव आयोजित करण्याची मागणी केली. त्यानुसार मोन्सेरात यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली व पणजीत शिगमोत्सव आयोजनाची शिफारस केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाने आता पणजीतही शिगमोत्सव आयोजित करण्यावर निर्णय झाला आहे.

गोवा नगरपालिका निवडणूकीसाठी नेत्र चिकित्सा शिबिरे स्टंट नव्हे 

संबंधित बातम्या