भारतीय नौदलासाठी प्रगत क्षेपणास्त्र फ्रिगेट प्रकल्प

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

गोवा शिपयार्डने भारतीय नौदलासाठी युद्धनौकेच्या निर्मिताच्या नव्या अध्यायाला सुरवात केली आहे.

वास्को:  गोवा शिपयार्डने भारतीय नौदलासाठी युद्धनौकेच्या निर्मिताच्या नव्या अध्यायाला सुरवात केली आहे. काल २१ रोजी या मिसाईलवाहक युद्धनौकेच्या पहिल्या प्लेट कटींगने पायाभरणी केली गेली. भारतीय नौदलाचे उपप्रमुख आणि परमविशिष्ट सेवा पदक, अतीविशिष्ट सेवा पदक सन्मानित व्हाईस ॲडमिरल जी. अशोककुमार यांनी व्हीडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी नौदलाचे मटेरियल्स प्रमुख आणि परमविशिष्ट सेवा पदक, अतीविशिष्ट सेवा पदक सन्मानित व्हाईस ॲडमिरल एस आर शर्मा, संरक्षण उत्पादन अतिरिक्त सचिव व्ही. एल. कंथाराव, गोवा ध्वाजाधिकारी रिअर ॲडमिरल पिलोपोज पायनूमुतिल आणि संरक्षण मंत्रालय व भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रशियन तंत्रज्ञानावर आधारित  दोन मिसाईलधारक युद्धनौका बांधणीचे कंत्राट गोवा शिपयार्डला जानेवारी २०१९ मध्ये देण्यात आले होते. पंतप्रधानांच्या "आत्मनिर्भर " आणि "मेक इन इंडिया " या व्हीजनखाली आयात पर्यायी प्रकल्प आहे. पी११३५.६ मालिकेतील युद्धनौका या अतिशय उत्तम मानल्या गेल्या आहेत आणि जलपृष्ठभाग, आकाश व पाण्याखालील युद्धासाठी उपयुक्त आहेत. त्यादृष्टीने रडार क्रॉससेक्शन, कमी इलेक्ट्रोमॅग्नेटीक, इन्फ्रारेड, सेन्सर्स, असे अत्याधुनिक डिझाईन व उपकरणे त्यावर असतील. पहिली युद्धनौका २०२६ मध्ये तयार होईल.

यावेळी बोलताना नौदल उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल जी. अशोककुमार यांनी सांगितले की, सध्याच्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत भारतीय नौदलाने सजग व सुसज्ज राहणे गरजेचे असल्याने या युद्धनौका बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. युद्धनौका बांधणीत पारंगत असलेल्या गोवा शिपयार्डचे मी अभिनंदन करीत आहे. जीएसएलचे अध्यक्ष व एमडी आणि नौदक पदक सन्मानित कमांडर बी बी नागपाल यांनी यावेळी सांगितले की, अत्याधुनिक मिसाईल युद्धनौकांची बांधणी करण्याचे काम हा गोवा शिपयार्डच्या इतिहासातील एक मानाचा तुरा आहे. आम्ही हा प्रकल्प वेळे आधी पूर्ण करू.

संबंधित बातम्या