गोव्यातील दुकानदारांचे कांद्यामुळे वांदे!

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

कांद्याच्या वाढत्या दरापासून  दिलासा देण्यासाठी सरकारने नागरी पुरवठा खात्याने स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्डद्वारे  कांद्यांचे वितरण व्यवस्था केली आहे.

 मोरजी : कांद्याच्या वाढत्या दरापासून  दिलासा देण्यासाठी सरकारने नागरी पुरवठा खात्याने स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्डद्वारे  कांद्यांचे वितरण व्यवस्था केली आहे. सुरवातीला प्रत्येक रेशनकार्डमागे १ किलो प्रमाणे कांद्याचे वितरण करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना कांद्यांचे वितरण केले. मात्र, या कांद्याचा दर्जा निकृष्‍ट असल्याने रेशनकार्डधारकांनी पाठ फिरवली आहे. त्‍यामुळे आधीच कुजका असलेला कांदा उचल न केल्याने खराब झाला आणि तो परत घेण्यासाठी पेडणे नागरी पुरवठा खात्याला लेखी पत्र दिले. मात्र, कांद्याच्या परताव्याविषयी निश्चिती नसल्याने हा कांदा दुकानात सडल्याने दुकानदारांना फटका बसला आहे.

सरकारने खरेदी करण्‍यास भाग पडलेल्‍या कुजक्या कांद्याचे काय करावे? असा प्रश्न सतावत आहे. नागरी पुरवठा खात्याने प्रती रेशनकार्डला ३ किलो प्रमाणे वितरण करण्याचे फर्मान काढल्याने आधीच कुजक्या कांद्यामुळे प्रचंड नुकसानी सोसावी लागलेल्या धान्य दुकानदारांपुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यात नागरीपुरवठा खात्याकडून कांद्याची उचल करताना आगावू पैसे भरावे लागतात. त्यामुळे कुजक्या कांद्यांचे नुकसान संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांना सोसावे लागणार आहे. कांद्याच्या वितरण व्यवस्थेमुळे स्वस्त धान्य दुकानदारांची अवस्था बिकट झाली आहे, त्यात सहकारी संस्थांच्या स्वस्त धान्य दुकाने अधिक संकटात आली आहे. कुजक्या कांद्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

१२ धान्‍य दुकानांकडून  उचल
पेडणे तालुक्यात १२ स्वस्त धान्य दुकाने असलेल्या पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीलाही या निकृष्‍ट कांद्यांची उचल करावी लागली. याविषयी पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद केरकर यांनी सांगितले की, पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीकडे एकूण १२ स्वस्त धान्य दुकाने आहेत. नागरी पुरवठा खात्याकडून प्राथमिक तत्त्‍वावर केवळ कोरगाव येथील स्वस्त धान्य दुकानासाठी  ३१.५० प्रतिकिलो प्रमाणे ३०० किलो कांद्याची उचल केली आणि ३४.५० पैसे प्रमाणे वितरण केले.

मात्र, त्या ३०० किलोतील ६० किलो कांदे कुजके निघाले. त्यानंतर नागरी पुरवठा खात्याने कांदा खरेदीसाठी तगादा लावल्यानंतर १७०० किलो कांद्यांची उचल करून १२ स्वस्त धान्य दुकानात पाठवला रेशन कार्डधारकांनी त्यातील चांगल्या कांद्याची उचल केली. कुचका कांदा पडून आहे. याविषयी नागरी पुरवठा खात्याला कळविल्यानंतर अधिकाऱ्यांनी पेडणे तालुका सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन कांद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. कांदा निकृष्‍ट असल्याची कबुलीही दिली. मात्र कुजका कांदा परत घेण्याविषयी कानावर हात ठेवले. याविषयी पेडणे सोसायटीने पेडणे येथील नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना कळवून कुजका कांदा परत घेण्यास सांगितले आहे.

दहा हजार ७१० रुपयांचा फटका
आतापर्यंत पेडणे तालुका शेतकरी सोसायटीने १७०० किलो कांद्याची उचल केली आहे त्यात २० टक्के कांदे कुजके आढळून एकूण ३४० किलो कांदे कुजलेले आढळले. त्यात १०,७१० रुपये नुकसान झाले आहे.  १७०० किलो कांद्यांची विक्री झाल्यानंतर प्रती किलो ३ रु प्रमाणे धरल्यास ५१०० रु नफा मिळणार होता. मात्र, कुजक्या कांद्यामुळे आधीच नुकसानी सोसावी लागल्याने आता पुढे काय करावे असा प्रश्न पडला आहे. पेडणे तालुका शेतकरी सोसायटीची १२ स्वस्त धान्य दुकाने असून त्यात ७८१३ रेशन कार्डधारक आहेत.

संबंधित बातम्या