धारबांदोड्यात घोरपडीच्या शिकारप्रकरणी सहाजणांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

तातोडी- धारबांदोडा येथील घोरपडीच्या शिकारीला गेलेल्या सहा संशयितांच्या घरावर रविवारी २० रोजी आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून सव्वा आठ किलो वजनाचे मांसासह इतर साहित्य फोंडा वनखात्याने हस्तगत केले.

फोंडा: तातोडी- धारबांदोडा येथील घोरपडीच्या शिकारीला गेलेल्या सहा संशयितांच्या घरावर रविवारी २० रोजी आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून सव्वा आठ किलो वजनाचे मांसासह इतर साहित्य फोंडा वनखात्याने हस्तगत केले. त्यात संशयित सदा वासू गावकर (४५), गीतेश दत्ता गावकर (३३), भानुदास गावडे (३७), राजेश्‍वर (दिलीप) गावकर (३३), सुरेश कृष्णा गावकर (५३) व मधू बाबूसो गावकर (४०) यांचा समावेश आहे. फोंडा व कुळे विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई करून एक दुचाकी, तीन कोयते व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे.

वनखात्याचा एक वनअधिकारी विशाल सुर्वे दुपारी आपल्या वाहनातून कुळे दिशेने जात असताना तातोडी येथे काही लोक रानात संशयास्पदरीत्या फिरताना निदर्शनास आल्यावर त्यांनी आपले वाहन रस्त्याजवळ थांबवून चौकशीसाठी गेले असता संशयितांनी थातूरमातूर कारणे दिली. त्यानंतर सर्व शिकाऱ्यांनी पळ काढला. मात्र, वन अधिकाऱ्यांनी शिकाऱ्यांकडून वापरण्यात आलेल्या दुचाकीचा क्रमांक नोंद करून आपल्या मोबाईलवरून चित्रफीत घेतली. त्यानंतर यासंबंधीची माहिती कुळे व फोंडा वन विभागाला दिल्यानंतर पुढील कृतीसाठी कुळे वन खात्याचे अधिकारी शामसुंदर गावस व इतर वनरक्षक यांनी तपासणीसाठी तातोडी येथे संशयितांच्या निवासस्थानी छापा टाकला असता सर्व सहाही संशयितांच्या घरात सव्वा आठ किलो घोरपडीचे मांस सापडले.

घोरपडीचे शिजवलेले मांसही जप्‍त
घोरपडीची शिकार केलेल्या चार संशयितांना फोंडा व कुळे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले तर दोन फरारी संशयित शिकारी फोंडा वनखात्याला शरण आले आहे. या सर्व सहाही संशयितांना ताब्यात घेतले आहे. फोंडा वनखात्याचे उपवनपाल आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कुळे वनविभागाचे अधिकारी शामसुंदर गावस अधिक तपास करीत आहे. तातोडी धारबांदोडा येथील सहा संशयितापैकी काही महिलांनी घोरपडीपासून शिजवलेले मांसही फोंडा वनखात्याच्या स्वाधीन केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या