सहा पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती; तिघांना नियमित, तर इतरांना कार्यवाहूचा आदेश

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

पोलिस उपअधीक्षपदी नियमित बढती करण्यात आलेल्यांमध्ये हंगामी पोलिस उपअधीक्षक असलेले प्रबोध शिरवईकर, निरीक्षक हरिष मडकईकर, निरीक्षक संतोष देसाई यांचा समावेश आहे. त्यांचा प्रोबेशन काळ दोन वर्षे असेल, मात्र सध्या त्यांना असलेल्या पदावरच पुढील आदेश निघेपर्यंत काम करण्यास सांगण्यात आले आहे. 

पणजी: राज्य सरकारने सहा पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती देणारा आदेश जारी केला आहे, मात्र त्यातील तिघांची नियमित तर इतर तिघांची कार्यवाहू म्हणून बढती केली आहे. मंत्रिमंडळाने आज (बुधवारी) सकाळी निरीक्षकांच्या बढतीला मंजुरी देताच संध्याकाळी उशिरा कार्मिक खात्याने हा आदेश काढला. 

पोलिस उपअधीक्षपदी नियमित बढती करण्यात आलेल्यांमध्ये हंगामी पोलिस उपअधीक्षक असलेले प्रबोध शिरवईकर, निरीक्षक हरिष मडकईकर, निरीक्षक संतोष देसाई यांचा समावेश आहे. त्यांचा प्रोबेशन काळ दोन वर्षे असेल, मात्र सध्या त्यांना असलेल्या पदावरच पुढील आदेश निघेपर्यंत काम करण्यास सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, पोलिस निरीक्षक उदय परब, निरीक्षक संदेश चोडणकर व निरीक्षक सलिम शेख यांची कार्यवाहू उपअधीक्षकपदी बढती देण्यात आली आहे व त्यांना या बढतीनुसार नियमित नियुक्तीसाठीचे कोणताही दावा करता येणार नाही. त्यांची ही सेवा ज्येष्ठतेसाठी गृहित धरली जाणार नाही किंवा पुढील बढतीसाठी पात्र ठरविले जाणार नाही. या अधिकाऱ्यांनीही सध्या ते असलेल्या पदावरच काम करावे असे गृह खात्याच्या अवर सचिव माया पेडणेकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या