सोनसडो कचरा यार्ड फुल्ल; कचरा भरलेल्या सहा गाड्या गॅरेजमध्येच

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

सोनसड्यावर कचरा `पुश` करणारे मशीन गेल्या सहा महिन्यांपासून हे मशीन बंद स्थितीत आहे. अद्यापपर्यंत हे ब्रेकडाऊन झालेले मशीन दुरुस्त करण्यात आलेले नाही.

नावेली: सोनसडो कचरा यार्डात कचरा फुल्ल झाल्याने कचरा टाकण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने बुधवारी दुपारपर्यंत कचरा गोळा करून भरण्यात आलेल्या पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या गॅरेजमध्ये पार्क करून ठेवण्यात आल्या आहेत. कचरा भरून पालिकेच्या गॅरेजमध्ये ठेवण्याची ही पालिकेच्या इतिहासातील पहिली घटना आहे.

पाच कॉम्टॅक्टर व एक खुला ट्रक मिळून सहा कचऱ्याच्या गाड्या कचरा भरून ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मडगाव पालिका सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सोनसड्यावर कचरा `पुश` करणारे मशीन गेल्या सहा महिन्यांपासून हे मशीन बंद स्थितीत आहे. अद्यापपर्यंत हे ब्रेकडाऊन झालेले मशीन दुरुस्त करण्यात आलेले नाही. सध्या दोन जेसीबी मशीनचा वापर करून कचरा पुढे ढकलला जात होता. मात्र, आता कचरा टाकण्यासाठी असलेली जागा फुल्ल झाल्याने कचरा टाकता येत नाही. पालिकेचे सर्व कचरावाहू ट्रक भरलेले असल्याने

बुधवारी सायंकाळी मडगावातील कचरा गोळा केला नाही. गुरूवारी सकाळी मडगावातील कचऱ्याची उचल होईल की नाही, हे सांगणे शक्य नसल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. नगराध्यक्षा पूजा नाईक व पालिका मुख्याधिकारी अजित पंचवाडकर याच्यात ताळमेळ नसल्याने ही वेळ आज पालिकेवर आली, अशी चर्चा मडगावात सुरू आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या