
Goa ST Reservation: आदिवासींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांचे नेते एकत्र येत नव्हते. विशेषतः विधानसभा सभापती रमेश तवडकर आणि कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे दिग्गज नेते एकत्र येत नसल्याने हा विषय रेंगाळण्याची चिन्हे निर्माण झाली होती.
अखेर विधानसभा संकुलात या दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर या विषयावर आम्ही एकत्र आहोत, असा संदेश जाहीरपणे देणे सुरू केले आहे.
त्यामुळे हा विषय प्रलंबित ठेवण्यासाठी आदिवासी नेत्यांमधील दुफळीचे निमित्त पुढे करणे आता सत्ताधारी भाजपला स्थानिक पातळीवर अशक्य झाले आहे.
सभापती रमेश तवडकर यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित असलेली काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करून क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी नेते परत एकत्र झाले आहेत, असे सूचित केले आहे.
मे महिन्यात झालेल्या प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी नेते विशेषत: सभापती आणि क्रीडामंत्री हे एकमेकांविरुद्ध असल्याचे चित्र तयार झाले होते.
आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीआधीच सोडवा, अशी मागणी भाजपच्या बैठकीत केली, तेव्हा ‘आधी तुमचे अंतर्गत मतभेद मिटवा’, असे मुख्यमंत्री सावंत यांनी आदिवासी नेत्यांना बजावले होते.
त्यादिवशी बंद खोलीत काय झाले?
दोघांमध्ये विस्तव जात नाही, असे चित्र असतानाच या दोन्ही नेत्यांमध्ये नेमका कधी समेट झाला, यावर उलट-सुलट माहिती मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनावेळी कला अकादमीचा स्लॅब कोसळल्याने मंत्री गावडे विरोधकांच्या कात्रीत सापडले होते.
अशा नाजूक प्रसंगी भाजप नेतृत्वही उघडपणे त्यांची बाजू घेत नव्हते.
अशा वेळी सभापती आणि मंत्री गावडे यांची विधानसभा संकुलात बंद खोलीत सुमारे अर्ध्या तासाची बैठक झाली.
या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील उपलब्ध नाही.
मात्र, त्या तीन-चार दिवसांत झालेल्या आदिवासी दिन कार्यक्रमात दोघेही एका मंचावर दिसले.
इतकेच नव्हे, तर हल्ली फोंड्यातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा ते व्यासपीठावर एकत्र दिसले.
ते छायाचित्र मंत्री गावडे यांनी लगेच सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
...असे संपविले मतभेद
आदिवासी दिन साजरा करताना तीन संघटनांचे वेगवेगळे कार्यक्रम झाले. पण शासकीय कार्यक्रमात व्यासपीठावर राज्यपालांसोबत विधानसभेतील सर्व आदिवासी आमदार, मंत्री, सभापती यांनी उपस्थित राहून एकीचे पहिल्यांदा दर्शन घडविले, ज्याचा फोटो मंत्री गावडे यांनी लगेच सोशल मीडियावर टाकला.
सौहार्दपूर्ण वातावरण
17 राज्यांतून आदिवासी कर्मचारी संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहिलेले सुमारे ५०० प्रतिनिधीही प्रेरणा दिन कार्यक्रमास उपस्थित होते. त्यावेळी सभापती तवडकर यांनी आपण भाषण न करता आपला वेळ मित्र गोविंद गावडे यांना देतो, असे सांगून त्यांनीही अप्रत्यक्षरित्या आता मतभेद राहिलेले नाहीत, असे सूचित केले होते.
मतभेद संपले
"आमच्यातील एकाला मी आणि गोविंद गावडे एकत्र आलेले नको होते. त्यामुळे आमच्यात मतभेद निर्माण झाले होते, हे खरे आहे. मी गावडे यांच्याशी बोललो आहे. समाजहितासाठी आम्ही एकत्र येणे आवश्यक आहे, हे त्यांना पटवून दिले. आता आमच्यात मतभेद राहिलेले नाहीत."
- रमेश तवडकर, सभापती.
"समाजाच्या हितासाठी आदिवासी नेत्यांनी एकत्र असणे गरजेचे आहे. त्यामुळे आता आम्ही सारे एकत्र काम करणार आहोत. तवडकर आणि माझी याबाबत चर्चा झाली, हे खरे आहे. आता आमच्यातील मतभेद संपले आहेत."
- गोविंद गावडे, मंत्री, कला व संस्कृती खाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.