पणजी : राज्याचे या वर्षातील पहिले अधिवेशन आज 25 ते 29 जानेवारीपर्यंत होणार असले तरी कामकाजाचे मात्र चारच दिवस असतील. या अधिवेशनाची सुरवात आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणाने होणार आहे. गेल्या काही महिन्यात सरकारने घेतलेल्या जनहितविरोधीनिर्णयामुळे विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार होणार सरकार व विरोधक यांच्यात सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
या विधानसभा अधिवेशनासाठी तारांकित व अतारांकित मिळून सुमारे 751 प्रश्न कामकाजात दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 195 तारांकित व 556 अतारांकित प्रश्न आहेत. याशिवाय दहा विधेयके असून त्यातील सहा सरकारी तर उर्वरित चार खासगी विधेयके आहेत. आज 25 रोजी सकाळी 11.30 वा. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरवात होईल. राज्यपाल कोश्यारी हे पहिल्यांदाच गोवा विधानसभा अधिवेशनात अभिभाषण करणार आहेत. त्यानंतर काही दुखवटा ठराव घेण्यात येऊन दिवसाचे कामकाज संपणार आहे.
दाबोळी विमानतळावर 95 लाखांचे सोने जप्त
27 जानेवारीपासून कामकाजाला सुरवात होणार असून त्यामध्ये प्रश्नोत्तराचा तास, शून्य प्रहर, पुरवणी मागण्या तसेच राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार व्यक्त करण्याचा कामकाजात समावेश आहे. शुक्रवारी खासगी कामकाजाचा दिवस असल्याने या दिवशी खासगी सदस्य विधेयक चर्चेला येणार आहेत. कोविड महामारीमुळे अधिवेशानासाठी लोकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. हे अधिवेशन कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून घेण्यात येत आहे.
राज्यातील पाणीटंचाई व म्हादई प्रश्न, शेळ - मेळावली आयआयटी प्रकल्प आंदोलन, मोले अभयारण्यातून नेण्यात येणारे तीन मोठे प्रकल्प, मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी, स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचा नोकरीचा प्रश्न, ‘ॲप’ सेवेमुळे धोक्यात असलेला टॅक्सी व मोटारसायकल पायलट व्यवसाय, राज्यातील बेरोजगारी, कोरोना स्थिती अशा अनेक विविध प्रकरणांवरून सरकारला विरोधक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. हे अधिवेशन तीन दिवसांचेच होणार असल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अधिवेशन २० दिवसाचे हवे
सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन २० दिवसांचे घेऊन चर्चा करून अर्थसंकल्प मंजूर करावा. लेखानुदान घेऊ नये. कारण गेल्या वर्षी लेखानुदान घेतले, पण वर्षभरात जेमतेम आठ दिवसच विधानसभा कामकाज चालले होते, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मत व्यक्त केले आहे.