गोवा विधानसभा अधिवेशन: गरज पडल्यास महादईसाठी पंतप्रधानांशी बोलू

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

म्हादईप्रश्नी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय जलसंपदामंत्री यांच्याकडे सर्व आमदारांचे शिष्टमंडळ नेण्याची सरकारची तयारी आहे. सरकारने म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाईची सर्व तयारी केली आहे.

पणजी: म्हादईप्रश्नी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय जलसंपदामंत्री यांच्याकडे सर्व आमदारांचे शिष्टमंडळ नेण्याची सरकारची तयारी आहे. सरकारने म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाईची सर्व तयारी केली आहे. मात्र, त्याची चर्चा अशी उघडपणे करता येणार नाही. आमदारांना जाणून घेण्यास रस असेल, तर त्यासाठी वेगळी बैठक सरकार आयोजित करेल, असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत केले.

“मी कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. पक्षाचे आणि सरकारचे हित हे राज्याच्या हितापेक्षा महत्त्वाचे नाही. शिष्टमंडळामध्ये पंतप्रधानांना भेटावे लागले तरी आम्ही मागे येणार नाही," असे सावंत यांनी सभागृहात सांगितले.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, विजय सरदेसाई, रोहन खंवटे, रवी नाईक, प्रसाद गावकर, जयेश साळगावकर, लुईझिन फालेरो, सुदिन ढवळीकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व विनोद पालयेकर यांनी सादर केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, म्हादई मला मातेसमान आहे. म्हादई विषयावर सरकार राजकारण करणार नाही. कर्नाटकात भाजपचे सरकार असले, तरी याविषयावर कोणतीही तडजोड नाही. सरकार या विषयावर कोणासमोरही झुकणार नाही. याविषयावर आम्ही सारे एक आहोत, हे चित्र आज विधानसभेत दिसले याचे सकारात्मक परिणाम होणार आहेत. म्हादई जलवाटप तंटा लवादाच्या निवाड्यास आम्ही आव्हान दिले आहे. कर्नाटकविरोधात आणखी दोन याचिकाही सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या आहेत. म्हादईच्या खोऱ्यातील पाणी इतर खोऱ्यात वळवता येणार नाही, अशी आमची भूमिका आहे. पाण्यातील क्षारतेचे प्रमाण आणि खोऱ्यातील पाणी मोजण्यात झालेली चूक हे नवे मुद्दे आम्ही सर्वोच्च न्यायालयातील याचिकांद्वारे आम्ही चर्चेत आणले आहेत. 

म्हादई रक्षण ही संपूर्ण गोमंतकीयांची जबाबदारी आहे. गोवा सरकार वेळोवेळी गरज त्यानुसार आपले काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयात किंवा जल लवादाकडे वारंवार आक्षेप याचिका तसेच हस्तक्षेप याचिका दाखल करत आहे. सरकारसाठी  म्हादई विषय गंभीर बाब आहे. मात्र विरोधकांनी राजकारण करण्यासाठी म्हादईचा वापर करू नये, असे आवाहन जलस्रोत खात्याचे मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीज यांनी आज केले. म्‍हादईप्रश्‍‍नी सरकार खात्याचे मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीज यांनी आज केले.

महाराष्ट्राच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित बातम्या