गोवा राज्य सरकारने केली ‘जेएसडब्ल्यू’ कडे १५६ कोटी रुपयांची मागणी

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

राज्य सरकारने ‘जेएसडब्ल्यू’ कंपनीकडे १५६ कोटी रुपयांची मागणी करणारी नोटीस आज बजावली आहे. कोळसा हाताळणीसंदर्भात अधिभारासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

पणजी: राज्य सरकारने ‘जेएसडब्ल्यू’ कंपनीकडे १५६ कोटी रुपयांची मागणी करणारी नोटीस आज बजावली आहे. कोळसा हाताळणीसंदर्भात अधिभारासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. मुरगाव बंदरात २०१२-१३ पासून कोळसा हाताळणी होत असून ‘अदानी’ व ‘जेएसडब्ल्यू’ या दोन कंपन्या कोळसा हाताळणी करतात. त्यात ‘जेएसडब्ल्यू’च्या कोळसा हाताळणीचे प्रमाण ‘अदानी’ कंपनीच्या हाताळणीपेक्षा जास्त असल्याचे मुरगाव बंदर व्यवस्थापनाकडे (एमपीटी) उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून उघड होत आहे. 

तीन वर्षांत एक दशलक्ष टन कोळसा आयात
सध्या जनआंदोलनात ‘अदानी’ गोव्यात कोळसा आणतात आणि ते यापुढे ५० दशलक्ष टनाहून अधिक कोळसा गोव्यात आणणार, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. मुरगाव बंदर व्यवस्थापनाकडे (एमपीटी) चौकशी केली असता ‘अदानीं’च्या कंपनीकडे वार्षिक ५.२ दशलक्ष टन कोळसा हाताळण्याची परवानगी असताना गेल्या तीन वर्षात १ दशलक्ष टनापेक्षा कमी कोळसा आणला, अशी माहिती मिळाली आहे.
लोकांची भीती निराधार!
जेएसडब्ल्यू कंपनी आयात केलेल्या ८० टक्के कोळसा बेल्लारी येथील पोलाद प्रकल्पासाठी वापरण्यात येतो. त्याची वाहतूक लोहमार्गाने केली जाते. त्यांची खरी गरज १५ दशलक्ष टन असून उर्वरित कोळसा ते कृष्णापट्टणम बंदरातून आयात करतात. गोव्यालगत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोळशाची मागणी नोंदवणाऱ्या कंपन्या नसल्याने ५० दशलक्ष टन कोळसा आयात केला जाणार, ही भीती निराधार असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी कोळशा आयातीवरून विरोधकांनी आंदोलन सुरू केले होते. तसेच रेल्‍वे दुपदरीकरणाचा प्रश्‍‍नही त्‍यांनी लावून धरत आंदोलने केली होती.

आरोप व वस्‍तुस्‍थितीत तफावत
मोले येथील तिन्ही प्रकल्पांना सध्या विरोध होत आहे. त्यातील लोहमार्ग दुपदरीकरणाला विरोध हा कोळसा वाहतूक वाढेल, या भीतीपोटी केला जात आहे. यापूर्वी मुरगाव बंदरातून मिळालेल्या माहितीनुसार कोळसा वाहतूक घटल्याचे दिसले होते. आता ‘अदानीं’बाबत चौकशी केली असता जनआंदोलनातील आरोप आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते. अदानींकडे सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांतर्गत मुरगाव बंदरातील धक्का क्र.६ चा ताबा आहे. ‘जेएसडब्ल्यू’ कंपनीने अदानींच्या या धक्क्याचा वापर करत ३ दशलक्ष टन कोळशाची आयात केली याव्यतिरीक्त या कंपनीने आपल्या ताब्यातील क्र. ७ या धक्क्यावर ५.५ दशलक्ष टन कोळसा आयात केला.

‘जेएसडब्‍ल्यू’ स्टील कंपनीला नोटीस 
गोवा ग्रामीण व कल्याण अधिभार नियमानुसार मुरगाव बंदरातून ‘जेएसडब्ल्यू’ स्टील कंपनीच्या प्रकल्पापर्यंत कोळसा वाहतुकीसाठी १५६ कोटी रुपये जमा करण्याची नोटीस दक्षिण गोवा सहाय्यक संचालकांनी बजावली आहे. ही रक्कम जमा करण्यास पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. कंपनीने सुमारे ३१.२ दशलक्ष मेट्रीक टन कोळसा वाहतूक २०१४ ते २०१८ या काळात वाहतूक केला होता. प्रत्येक टनामागे ५० रुपये अधिभाराप्रमाणे ही रक्कम सुमारे १५६.३४ कोटी रुपये होते. मुरगाव बंदर कोळसा आयात करून तो गोव्यातून कर्नाटकात नेण्यात आला होता. ही रक्कम दिलेल्या मुदतीत जमा न केल्यास दोन वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे सहाय्यक वाहतूक संचालकांनी नोटिशीत नमूद केले आहे.
 

संबंधित बातम्या