नववर्षांरंभी गोव्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळणार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 2 जानेवारी 2021

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देणे सुरू केले.  काल दिवसभरात ६४ लाख रुपयांची भरपाई ३१५ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.

पणजी  :  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देणे सुरू केले.  काल दिवसभरात ६४ लाख रुपयांची भरपाई ३१५ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. एकूण १ कोटी ५४ लाख रुपयांची भरपाई ८२५ शेतकऱ्यांना दिली जाणार असून सोमवारपर्यंत उर्वरित भरपाई शेतकऱ्यांना अदा केली जाणार आहे. या व्यतिरीक्त यंदा ऊस सरकारने न घेतल्याबद्दल प्रती टन ३ हजार रुपयांची नुकसान भरपाईही सरकार यानंतर अदा करणार आहे.

उस उत्पादक सुविधा समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या ऊस कापणीच्या खर्चापोटी प्रती टन ६०० रुपये भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सोमवारपर्यंत सर्व रक्कम प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कृषी खात्याचा पदभार सांभाळणारे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे साऱ्या विषयाबाबत सकारात्मक आहेत. संजीवनी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळत आहे.याच आठवड्यात या समितीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देण्याची शिफारस सरकारला केली होती. समितीने त्याविषयीचा लेखी अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. गेल्या वर्षी ऊस सरकारने घेऊन राज्याबाहेरील कारखान्यात गाळपासाठी पाठवला. यंदा सरकारने ऊस न घेता प्रती टन ३ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे ठरवले आहे.

गूळ उत्‍पादन प्रकल्‍प लवकरच : सावईकर

सावईकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे साडेचार हजार कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांचे साडेपाचशे कुटुंबीय थेटपणे कारखान्यावर अवलंबून आहेत. याशिवाय ऊस तोडणी कामगार, वाहतुकदार, कारखाना परिसरातील दुकानदार, गिरणीचालक, घर भाड्याने देणारे अशा सर्वांसाठी कारखाना आधार आहे. तो सरकार हिरावून घेणार नाही. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याशिवाय कारखान्याच्या आवारात गूळ उत्पादन करण्याचा छोटा प्रकल्प घालण्याचा विचार आहे. इथेनॉल, मद्यार्क आदींचेही उत्पादन घेण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचे हित जपणार : कवळेकर

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले की, उभ्या पिकाचे ८० लाख ८६ हजार रुपये याआधीच शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत. सरकार शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सर्वतोपरी कटिबद्ध आहे. सरकार हा कारखाना सुरू करणार आहे. संजीवनी साखर कारखान्याच्या बॅंक खात्यात सरकारने सर्व रक्कम जमा केली आहे. त्यापैकी काही रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली उर्वरीत रक्कम सोमवारी जमा केली जाणार आहे.

ऊस शेतकऱ्यांना अशी मिळेल भरपाई

 • पहिल्या वर्षी प्रती टन 
 • ३ हजार रुपये
 •  दुसऱ्या वर्षी प्रती टन 
 • २ हजार ८०० रुपये
 •  तिसऱ्या वर्षी प्रती टन 
 • २ हजार ६०० रुपये
 •  चौथ्या वर्षी प्रती टन 
 • २ हजार ४०० रुपये
 •  पाचव्या वर्षी प्रती टन 
 • २ हजार २०० रुपये

आकडे बोलतात...

 •  १९७३ मध्ये कारखान्याची सुरवात
 •  १९९१ मध्ये २ हजार २२२ शेतकरी सदस्य
 •  सध्याची सदस्यसंख्या ९५६
 •  राज्यात ३४ हजार टन तयार ऊस
 •  कारखान्यात ११० कर्मचारी

 

अधिक वाचा :

गोव्यासह देशभरात आज होणार कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

 

संबंधित बातम्या