Goa: मुख्यमंत्री 'ऍक्शन मोडवर'; राज्यातील 21 रुग्णालयं घेतली सरकारच्या ताब्यात

Goa government has taken over 21 private hospitals in Goa.
Goa government has taken over 21 private hospitals in Goa.

                                                                                        पणजी: गेले काही दिवस कोविड व्यवस्थापनावरून राज्य सरकारवर (Goa Government) होत असलेल्या टीकेची दखल घेत सरकारने प्रतिमा सुधार योजनेची कार्यवाही सुरू केली आहे. बांबोळी येथील गोवा (Goa) वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ परिसरात 24 तासांत 20 हजार लीटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी (Oxygen Tank) उभारून ती कार्यान्वित करण्यासह राज्यभरातील 21 खासगी इस्पितळांत कोविड (Priavate Covi19 Hospitals) रुग्ण दाखल करण्याचे अधिकार सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यात कोणतेही मतभेद आता राहिले नाहीत हे दाखवण्यासाठी दोघांनी आज बांबोळीला जाऊन टाकीची संयुक्त पाहणी केली आणि कोविड महामारीच्या काळात अलीकडच्या काळात प्रथमच एकत्रितपणे पत्रकार परिषद संबोधित केली. (Goa State Government has taken over 21 private hospitals in Goa.)

दीनदयाळ स्वास्थ्य योजनेत कोविड उपचार समाविष्ट केल्यानंतर खासगी इस्पितळांनी या योजनेंतर्गत उपचार देणे नाकारले होते. त्यासाठी इस्पितळांत रुग्णांना खाटा नाहीत असे कारण देऊन वाटेला लावण्यात येत होते. सरकारकडे तशा तक्रारी येत होत्या. त्यामुळे कोविडचे उपचार देत असलेल्या २१ खासगी इस्पितळांतील निम्म्या खाटा सरकार ताब्यात घेणार आणि सोमवारपासून त्या इस्पितळात कोविड उपचारासाठी रुग्ण दाखल करून घेण्याची प्रक्रिया सरकार आपल्या ताब्यात घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आरोग्य सचिव रवी धवन, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा व इतर डॉक्टर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील सरकारी इस्पितळाच्या खाटा कोरोना रुग्णांसाठी कमी पडत असल्यामुळे खासगी इस्पितळातील 50 टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध कराव्यात. तसेच  डीडीएसवायचा लाभ गोवेकरांना कोरोना उपचारासाठी द्यावा. अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, वारंवार सूचना करूनही अनेक इस्पितळांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास चालढकल सुरू केली. काहींनी  कोरोना रुग्णांना दाखल करून घेतले. मात्र, बिले भरमसाठ लावली. त्यामुळे शेवटी सरकारने खासगी इस्पितळावर कडक कारवाई करण्याच्या इराद्याने ती 21 ही खासगी इस्पितळे ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. उद्या तारीख 16 मे रोजी त्याबाबतचा आदेश जारी होणार असून 17 मे पासून राज्यातील 21 ही खाजगी इस्पितळांत रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडे असेल, तर  इस्पितळांचे व्यवस्थापन त्या खासगी इस्पितळांकडेच राहणार आहे. त्या इस्पितळांत जे यापूर्वी रुग्ण दाखल असतील त्यांच्यासाठी 50 टक्के खाटा सोडण्यात येतील व उर्वरित 50 टक्के खाटांचा ताबा सरकार आपल्याकडे घेणार आहे. खासगी इस्पितळातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी  कायम राहणार असून सरकारने दाखल करून घेतलेल्या कोरोना रुग्णावर तेच उपचार करतील. सरकारचे डॉक्टर तेथे जाणार नाहीत.

राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी व विविध कारणांमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकार सर्वप्रकारचे प्रयत्न करत असून अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सुपर स्पेशॅलिटी इस्पितळामध्ये आज 350 गंभीर कोरोना रुग्णांना हलवण्यात आले आहे. तेथे अत्याधुनिक  ऑक्सिजन यंत्रणा उपलब्धत आहे. पंतप्रधान आरोग्य सेवा अंतर्गत हे इस्पितळ बांधण्यात आले असून अद्याप त्याचे उद्‍घाटन करण्यात आलेले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या कोविड वार्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना ऑक्सीजनचा पुरवठा योग्य तऱ्हेने व्हावा यासाठी 20 हजार किलो लीटर ऑक्सीजनची टाकी आज कार्यान्वित करणयात आली. मुख्यमंत्र्यांनी आज या टाकीची पाहणी केली. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढलेली असून पॉझिटिव्ह होण्याची टक्केवारी 50 टक्‍क्‍यांवरून आता 35 टक्क्यंवर आली आहे. हा दर येत्या काही दिवसांमध्ये आणखी खाली येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रुग्ण सापडण्याचा दर 31.1 टक्क्यांवर घसरला
कोविडचे रुग्ण वाढीचा दर आता मंदावला आहे. या महिन्यात 1 ते 5 मे दरम्यान दररोज सरासरी 816 रुग्ण सापडत होते. 6 मे ते 10 मे पर्यंत दररोज सरासरी 527, तर आता 11 ते 15 मे दरम्यान सरासरी 436 रुग्ण सापडले आहेत. आजर राज्यात एकूण बऱ्या झालेल्या रुग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला. आज बरे झालेले रुग्ण जमेस धरता 1 लाख 1 हजार 712 रुग्ण बरे झाले आहेत. आज एकूण मृत्यूच्या संख्येने दोन हजारचा टप्पा पार केला, एकूण मृत्यू 2 हजार 56 झाले आहेत, सध्या उपचार घेत असलेली  रुग्णसंख्येनेही 30 हजाराचा आकडा पार गेला आहे. चाचणीच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचा दरही आज निच्चांकी पातळीवर म्हणजे 35.1 टक्क्यांवर घसरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com