व्यवसाय सुलभतेसाठी राज्य सरकार प्रयत्नशील

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

पर्यटन व्यावसायिकाला विनासायास परवाने मिळावेत, त्याला शुल्क भरताना कोणताही त्रास होऊ नये अशी यंत्रणा उभी करण्याचे सरकारने ठरवले आहे. व्यवसाय सुलभतेत तीन आठवड्यांपूर्वी जाहीर झालेल्या राष्ट्रीय क्रमवारीत गोव्याचे स्थान घसरल्याची दखल सरकारने घेतली आहे.

पणजी- व्यवसाय सुलभतेत गोव्याचा क्रमांक राष्ट्रीय पातळीवर वधारावा यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी पर्यटन क्षेत्रातील परवाने, शुल्क आदींबाबत सुसुत्रता आणण्याचे ठरवले आहे. व्यवसाय सुलभतेसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध खाते प्रमुखांची बैठक घेत त्यांची मते आणि सूचना जाणून घेतल्या.

पर्यटन व्यावसायिकाला विनासायास परवाने मिळावेत, त्याला शुल्क भरताना कोणताही त्रास होऊ नये अशी यंत्रणा उभी करण्याचे सरकारने ठरवले आहे. व्यवसाय सुलभतेत तीन आठवड्यांपूर्वी जाहीर झालेल्या राष्ट्रीय क्रमवारीत गोव्याचे स्थान घसरल्याची दखल सरकारने घेतली आहे. कोणत्या मुद्यांवर क्रमवारी घसरली याचा आढावा घेत क्रमवारीत वर जाण्यासाठी काय करता येईल याची चाचपणीही या बैठकीत करण्यात आली.
सर्व खात्यांनी काय काय केले पाहिजे याचे तपशीलवार परिपत्रक राज्याचे मुख्य सचिव परीमल राय यांनी जारी केले आहे. राज्यात येणाऱ्या प्रकल्पांबाबत खात्यांच्या पातळीवर कोणते निर्णय घेतले याची माहिती गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला देण्यात यावी. मंडळात कोणते महत्वाचे बदल केल्यास खात्यांची कामे मार्गी लागतील याविषयी खातेप्रमुखाने अहवाल सादर करावा. प्रकल्पांसंदर्भातील फाईल्स या वित्त खात्याने प्राधान्याने हातावेगळ्या कराव्यात आणि माहिती तंत्रज्ञान खात्याकडून अर्ज हाताळणीसाठी अर्ज हाताळणी सॉफ्टवेअर तयार करावे अशा सूचनाही या परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या