गोव्यात रस्ते अपघातात लक्षणीय वाढ, एकाच महिन्यात १३ जणांचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

गेल्या काही वर्षांपासून गोव्यात रस्ता अपघातांत लक्षणीय वाढ झालेली असून वर्ष २०१९ मध्ये तब्बल २९७ व्यक्तींचा रस्ता अपघातांत मृत्यू झाल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

म्हापसा : गेल्या काही वर्षांपासून गोव्यात रस्ता अपघातांत लक्षणीय वाढ झालेली असून वर्ष २०१९ मध्ये तब्बल २९७ व्यक्तींचा रस्ता अपघातांत मृत्यू झाल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. वर्ष २०१९ मध्ये सरासारी प्रत्येकी तीस तासांत रस्ता अपघातांत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे त्याद्वारे सूचित होते. सप्टेंबर २०२० मध्ये गोव्यात १३ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाल्याच्या नोंदी वाहतूक संचालनालयाने प्रसृत केलेल्या अहवालात आहेत.

अलीकडेच १५ नोव्हेंबर रोजी रस्ता अपघातात बळी गेलेल्यांच्या प्रीत्यर्थ जागतिक स्मृतिदिन पाळण्यात आला. केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्देशित केलेल्या तक्त्यानुसार गोवा राज्य पोलिस खात्याने अपघातविषयक वार्षिक अहवाल जाहीर केला असून त्याअंतर्गत वर्ष २०१९ मध्ये गोवाभर रस्ता अपघातांत बब्बल २९७ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची, तर २६५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.

वाहतूक संचालनालयाने २१ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसृत केलेल्या मासिक अहवालानुसार, सप्टेंबर २०२० मध्ये रस्ता अपघातांत १३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची, तर १३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. तसेच, ७२ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचे उघड झाले आहे. 
त्यापैकी उत्तर गोव्यात ३, तर दक्षिण गोव्यात १० जणांचा मृत्यू झाला. त्या महिन्यात गोवाभर १५६ अपघात झाल्याची विविध पोलिस स्थानकांत नोंद झालेली आहे.

रस्ता अपघातात बळी गेलेल्यांच्या जागतिक स्मृतिदिनानिमित्त ‘गोवा कॅन’ने जनजागृती करून जनतेसाठी या विषयासंदर्भात काही सूचनाही केल्या आहेत. नियमित कार्यक्रमांचे औचित्य साधून मंदिर, चर्च, मशीद, गुरुद्वार, प्रार्थनास्थळे इत्यादी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जनजागृती करण्याचे आवाहन संबंधित संस्थांच्या प्रमुखांना या संस्थेने केले आहे.

२०१९ मध्ये मृत झालेल्यांचा मासिक तपशील
जानेवारी – २७, फेब्रुवारी २१, मार्च – २५, एप्रिल - ३०, मे – ३३, जून – २९, जुलै - २१, ऑगस्ट – १७, सप्टेंबर – १५. ऑक्टोबर – २४, नोव्हेंबर - २९, डिसेंबर – २६. अशा रस्ता अपघातांत वाहनचालक, वाहनचालक, पादचारी, प्रवासी, सायकलचालक, तसेच अन्य व्यक्ती मृत अथवा जखमी झाले आहेत.

या सप्ताहात संबंधित प्रभागात अथवा कार्यक्षेत्रात शैक्षणिक संस्था, बिगरशासकीय संस्था, गृहनिर्माण वसाहतींचे व्यवस्थापन इत्यादींनी आपापल्या भागांत सायंकाळी सात ते रात्री आठ या वेळेत मेणबत्ती यात्रा/ मिरवणूक काढून जागृती करावी, असे ‘गोवा कॅन’चे संघटक रोलंड मार्टिन्स यांनी म्हटले आहे. तसेच, रस्ता अपघातांत गंभीर जखमी झालेल्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून शोकसंवेदना पाठवून त्यांचे मनोधैर्य उंचावणे, अपघातांत जीव गमावलेल्यांना पुष्पांजली अथवा आदरांजली व्यक्त करणे, रस्ता अपघातांत बळी पडलेल्यांसाठी वर्ष २०१५ पासून गोवा राज्यातर्फे कार्यरत असलेल्या आर्थिक साहाय्य योजनेची माहिती विविध माध्यमांतून जनमासापर्यंत तसेच आप्तेष्टांपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक गोमंतकीयाचे कार्य आहे, असेही श्री. मार्टिन्स म्हणाले.

वाहनचालक, पादचारी, सार्वजनिक प्रवास सुविधा देणारे खासगी वाहनांचे मालक, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन समित्या, वाहतूक संचालनालय, सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ते विभाग, वाहतूक पोलिस, आरोग्य संचालनालय, शैक्षणिक संस्था, आमदार-खासदार व अन्य लोलप्रतिनिधी, स्वयंसाहाय्य गट, ग्राहक मंच, बिगर शासकीय संस्था, धर्मसंप्रदाय, पालक व वडिलधारी मंडळी, शिक्षकवर्ग अशा विविध समाजघटकांनी हातांत हात घालून यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मतही ‘गोवा कॅन’ने व्यक्त केले आहे.

आणखी वाचा 
 

पुढील वर्षात रस्ता अपघात मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणण्याचे लक्ष्य: केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

संबंधित बातम्या