राज्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ!आरोग्य खात्याकडून विविध उपाययोजना

यशवंत पाटील
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

सध्या राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

पणजी: राज्यात कोरोना महामारीबरोबरच डेंग्यूच्या साथीनेही डोके वर काढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वी मांगोरहिलमध्ये डेंग्यूचा फैलाव झाला होता. त्यानंतर तेथे कोरोनाचे संसर्गस्थळ झाले आणि तेथून राज्यभरात फैलाव झाला. सध्या राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. कांदोळी, कळंगुट, पणजी, पर्वरी, कुठ्ठाळी, वास्को आदी परिसरात डेंग्यूचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले आहेत. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य खात्याकडून विविध उपाययोजना केली जात असून डास-माश्‍यांपासून उद्‍भवणाऱ्या आजारापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०१९ पर्यंत डेंग्यूच्या १४१ रुग्णांची नोंद झाली होती, तर यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०२० पर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २४८ वर पोहोचली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. त्यात कांदोळी, कळंगुट, पणजी, पर्वरी, कुठ्ठाळी आणि वास्कोत यंदा जास्त प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय व्हेक्टर जनित रोग नियंत्रण कार्यक्रमाचे उपसंचालक व वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पालेकर यांनी दिली. राज्यातील डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य खात्यातर्फे अनेक पर्याय आणि उपायांचा अवलंब करण्यात येत आहे. आरोग्य केंद्रात तपासणीस आलेल्या व डेंग्यू रोगाची लागण झाल्याची नोंद झालेल्या रुग्णांच्या घरी जाऊन तेथील परिसराची पाहणी केली जाते. तेथे टायर, प्लास्टिकचे डबे, नारळाच्या करवंट्या अशा पाणी साचून राहणाऱ्या वस्तू शोधून काढून त्याची विल्हेवाट लावली जाते. त्यानंतर त्या परिसरात जंतुनाशक फवारणी केली जाते, अशी माहिती डॉ. पालेकर यांनी दिली. डासांची उत्पत्ती होऊ दिली नाही, तर डेंग्यूचे प्रमाण कमी होणे शक्य आहे. त्यामुळे घराच्या परिसरात पाणी साचून राहील अशा वस्तू साठवू देऊ नका किंवा अशा वस्तू असल्यास त्या तेथून हटवा. कारण डेंग्यूच्या अंड्यांच्या पैदासीसाठी ५ ते १० मिली लिटर इतके पाणीसुद्धा पुरेसे असते. त्यामुळे घराच्या आजुबाजूला प्लेट, फ्लावर पॉटसारख्या वस्तूही ठेवू नका. प्रत्येक आठवड्याला घराच्या आजूबाजूला पाणी साचण्याच्या जागा तपासा, असे आवाहन डॉ. पालेकर यांनी केले आहे.

तपासणी करून घेण्याचे आवाहन
सध्या सर्दी, खोकला, तापाची साथ असल्याने लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ताप आल्यास तो अंगावर काढू नये किंवा तापाचे निदान डॉक्‍टरला न दाखवता स्वत:च करू नये. एखादा ताप हा मलेरिया, डेंग्यू आहे की कोरोना हे चाचणी केल्याशिवाय स्पष्ट होत नाही. त्यामुळे लोकांनी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. राज्यातील नागरी आणि ग्रामीण आरोग्य केंद्रात डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाची चाचणी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप आल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पालेकर यांनी केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या