आय‌आयटीसाठी सीमांची आखणी करू देणार नाही; मेळावलीवासीयांचा निर्धार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

गुळेली आय‌आयटी प्रकल्पाच्या सीमांची आखणी बुधवारपासून सुरू झाली असून आज स्थानिक लोकांनी मुरमुरे येथे धनगरवाड्यावर जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून  या आयआयटी प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले.

गुळेली: गुळेली आय‌आयटी प्रकल्पाच्या सीमांची आखणी बुधवारपासून सुरू झाली असून आज स्थानिक लोकांनी मुरमुरे येथे धनगरवाड्यावर जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून  या आयआयटी प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. सकाळपासून या ठिकाणी सुमारे दोनशेच्या आसपास लोकांनी उपस्थिती लावली होती व सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना या भागात जायला द्यायचे नाही असे ठरवले होते, परंतु सर्वेक्षण करणारे सरकारी अधिकारी या ठिकाणी फिरकलेच नाहीत. दुपारपर्यंत या आंदोलकांनी या ठिकाणी रस्त्यावर ठिय्या मांडला होता.

काल मेलावळी पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समितीच्यावतीने उपजिल्हाधिकारी  राजेश आजगावकर यांना निवेदन सादर केले होते. त्यात आमच्या पोटच्या जमिनी नावावर करा, तसेच  गुळेली पंचायतीने याबाबत ग्रामसभा घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर हे सर्वेक्षणाचे चाललेले काम बेकायदेशीर असून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून न घेता सरकार एकाधिकारशाही करून हे काम करत आहे ते त्वरित बंद करावे, अशी मागणी केली आहे.

आज या ठिकाणी जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले, की आम्ही आता यापुढे सरकारचा असा एकाधिकारशीपणा सोसणार नसून एकतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत किंवा या भागाचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना या ठिकाणी येऊन आमचे जे काय म्हणणे आहे ते समजून घ्यावे. जोपर्यंत असे होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना  सर्वेक्षण करू देणार नाही. मग भलेही आम्हाला कुठल्याही परिस्थितीतून जावे लागल्यास हरकत नाही, असे मेलावळी पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी या आंदोलकांनी उपस्थित असलेल्या सत्तरी तालुका संयुक्त मामलेदार संजीवनी सातर्डेकर यांना निवेदन सादर केले. काल उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांना निवेदन दिले आहे. तसेच यापूर्वी पंचायत, सर्व आमदार, मंत्री यांना निवेदने सादर करून हा नियोजित आयआयटी प्रकल्प रद्द करून अन्यत्र हलवावा अशी कायदेशीर मागणी केली आहे. या दिवसांपर्यंत आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन केले आहे. मात्र, आता आमचा तोल जाऊ लागला असून यापुढे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा यावेळी विरोधकांनी दिला. आज या ठिकाणी वाळपई गट काँग्रेस समिती महिला अध्यक्ष रोशन देसाई विरोधकांना आपला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या