म्हादईची क्षारता तपासणीची नाटके नको;  सुदिन ढवळीकर यांचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

सुदिन ढवळीकर म्हणाले, आता म्हादईची क्षारता तपासणीसाठी जी दोघाजणांची समिती गोव्यात आली आहे, त्यांच्या अहवालाचा काहीही फायदा म्हादईसाठी होणार नसून केंद्र सरकार पातळीवर ही केवळ नाटके चालली असल्याने आपण या कृतीचा निषेध करीत असल्याचे म्हादईचे पाणी पळवण्यासाठी कर्नाटक सरकार नाना तऱ्हेची नाटके करीत आहेत.

फोंडा: भर पावसाळ्यात म्हादईची पाणी तपासण्याची ही वेळ नसून पाण्याची खरी क्षारता ही १५ मार्चनंतरच स्पष्ट होते, त्यामुळे म्हादईच्या पाण्याच्या क्षारतेचा खरा अहवाल हा मार्चच्या पंधरवड्यानंतर मेपर्यंत मिळू शकतो, अशी  माहिती माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ढवळीकर म्हणाले, आता म्हादईची क्षारता तपासणीसाठी जी दोघाजणांची समिती गोव्यात आली आहे, त्यांच्या अहवालाचा काहीही फायदा म्हादईसाठी होणार नसून केंद्र सरकार पातळीवर ही केवळ नाटके चालली असल्याने आपण या कृतीचा निषेध करीत असल्याचे म्हादईचे पाणी पळवण्यासाठी कर्नाटक सरकार नाना तऱ्हेची नाटके करीत आहेत. या नाटकांना राज्य सरकारने फशी पडू नये, असे आवाहनही सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. म्हादईचे पाणी कर्नाटककडून वळवण्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे कर्नाटक सरकार काहीसे हतबल ठरले आहे. 

मात्र म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवल्यास गोव्यातील पाण्याची क्षारता वाढून ते पिण्यायोग्य ठरणार नसल्याने गोमंतकीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल, त्यामुळे म्हादईचे पाणी वळवू नये असे मत राज्य सरकारने मांडल्याने आता केंद्र सरकारने राष्ट्रीय हायड्रॉलॉजी इन्स्टिट्यूट रूरकेला येथून दोघाजणांची तज्ज्ञ समिती गोव्यात आली आहे. सध्या ही पाण्याच्या क्षारतेची तपासणी चालली आहे. मात्र ही तपासणी तकलादू ठरणार आहे. त्यामुळे येत्या मार्चमध्येच क्षारतेचे खरे प्रमाण स्पष्ट होऊ शकते, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले आहे. 

या दोघाहीजणांनी म्हादईच्या पात्राची अनेक ठिकाणी पाहणी केली आहे. मात्र पावसाळा संपण्याचा हा काळ असून पाण्याची क्षारता आता लक्षात येणे शक्‍य नाही.

त्यातच साखळी भागात वाळवंटी नदीला अंजुणे धरणाचे पाणी मिळत असल्याने क्षारता सापडणे कठीण असून ओपा - खांडेपार येथे तसेच अन्य ठिकाणी ही क्षारता स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे गोव्यातील पाण्याची खरी क्षारता तपासणीसाठी मार्च १५ तारीख ते मे १५ तारीखपर्यंत तपासणी व्हायला हवी, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. 

कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देण्यासाठी हा एकप्रकारचा घाटही असू शकतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावधगिरी बाळगताना जे खरे आहे, ते स्पष्टपणे केंद्र सरकारला सुनावले पाहिजे, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले. अन्यथा बैल गेला आणि झोपा केला असा प्रकार होऊ शकतो, अशी टिप्पणी त्यांनी व्यक्त केली.

म्हादई बचाव आंदोलन...!
मगो पक्षातर्फे मागच्या काळात म्हादई बचाव आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मात्र सरकारकडून अपेक्षित कृतीचा प्रतिसाद मिळाला नाही. म्हादईचा हा विषय केवळ मगो पक्षापुरता मर्यादित नसून सबंध गोमंतकीयांचा आहे. उद्या म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवले तर गोमंतकीयांना पाण्यासाठी मोताद व्हावे लागेल, म्हणून आताच जागे व्हा, आणि योग्य निर्णय घ्या, असे मत मगो पक्षाच्या सदस्यांतर्फे व्यक्त केले जात आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या