‘तो’ रस्ता १९८७ साली बांधलेला! दाभाळ पंचायतीचा खुलासा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

मुक्‍या आईवडिलांना त्रास करण्याचा आणि जमिनीवर अतिक्रमण केल्याचा तारा गावकर हिने केलेला आरोपही दिशाभूल करणारा असल्याचे दाभाळ पंचायतीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

फोंडा: कोडली- दाभाळ पंचायत क्षेत्रातील मल्लारीमळ येथील आपल्या मालकीच्या जमिनीत अतिक्रमण करण्यात आले असल्याचा कांगावा करणारी तारा गावकर ही खोटे बोलत असून राजकीय हेतूनेच कुणी तरी तिला हे खोटे बोलण्यासाठी फूस लावत असल्याचा आरोप दाभाळ पंचायतीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून करण्यात आला आहे. 

मुक्‍या आईवडिलांना त्रास करण्याचा आणि जमिनीवर अतिक्रमण केल्याचा तारा गावकर हिने केलेला आरोपही दिशाभूल करणारा असल्याचे दाभाळ पंचायतीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

ज्या रस्त्याबाबत तारा गावकर बोलत आहे, तो रस्ता आजचा नसून १९८७ साली ग्रामीण विकास यंत्रणेने बांधला आहे. पंचायतीतर्फे या रस्त्यावर हॉटमिक्‍सिंग करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत, तेसुद्धा स्थानिक लोकांच्या मागणीनुसारच, असे दाभाळ पंचायतीचे उपसरपंच शशिकांत गावकर यांनी सांगितले. १९८७ साली ताराचे वडील संतोष गावकर यांनी या रस्त्याच्या कामासाठी इतर जमीन मालकांबरोबरच ना हरकत पत्र दिले आहे. हा गावचा रस्ता बनला असून लोकांच्या मागणीवरूनच हा रस्ता करण्यात आला होता, त्यामुळे फसवणुकीचा प्रश्‍नच नसल्याचे दाभाळ पंचायतीतर्फे सांगण्यात आले. 

दरम्यान, तारा गावकर यांचे शेजारी प्रितेश गावकर यांनी तारा गावकर यांचे सर्व आरोप खोडून काढले असून जागेत अतिक्रमण केले असेल असे तारा गावकर यांना वाटत असेल, तर तिने ते कागदोपत्री सिद्ध करावे, आम्ही मागे हटण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या