गोवा: वीज ट्रान्समिशन प्रकल्पाला विरोध कायम

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

मोलेतील सभेत आरोप-प्रत्यारोप

धारबांदोडा: मोले पंचायत क्षेत्रातील सुकतळी येथील नियोजित वीज ट्रान्समिशन प्रकल्पासंबंधी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सभेत गोंधळ माजला. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी आणि प्रकल्पासंबंधीची साधकबाधक चर्चा यामुळे बैठकीत गदारोळ झाला. वाहिन्या टाकण्यापूर्वी अभ्यास करूनच प्रकल्प नियोजित जागेत होणार असून सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा सरकार पक्षातर्फे करण्यात आली तर पर्यावरणदृष्ट्या हा प्रकल्प घातक असून आधी सुरक्षेची हमी द्या, अन्यथा विरोध कायम असल्याचे विरोधकांनी सुनावले. 

यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोले पंचायत क्षेत्रातील या नियोजित वीज ट्रान्समिशन प्रकल्पासंबंधी काही संघटनांकडून विरोध होत असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी आज (शनिवारी) माकडये येथील महादेव सभागृहात ही सभा बोलावण्यात आली होती. या सभेला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर, वीजमंत्री नीलेश काब्राल तसेच या प्रकल्पाचे काम हाती घेतलेले तानमार कंपनीचे प्रतिनिधी श्री. पिकळे, मोले सरपंच तन्वी केरकर, सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर, मोले उपसरपंच सुशांत भगत, पंच रामकृष्ण गावकर, समर कदम, राजेश सांगोडकर, बाबू शेळके, स्नेहलता नाईक तसेच मामलेदार शर्मिला गावकर आदी उपस्थित होत्या. 

आमदार तथा मंत्री दीपक पाऊसकर यांनी या प्रकल्पाच्या साधकबाधकतेविषयी माहिती द्यावी, अशी मागणी उपस्थितांनी केली असता, दीपक पाऊसकर यांनी सुरळीत वीजवहनाबरोबरच स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

श्री. पिकळे  म्हणाले, गोवा विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी या प्रकल्पाची कार्यान्विती आवश्‍यक आहे. हा प्रकल्प छत्तीसगड येथून कर्नाटकमार्गे गोव्यात येत असून विजेच्या तक्रारी दूर करून गोव्यात सुरळीत वीजवहन होईल, अशा पद्धतीचा हा प्रकल्प असल्याचे सांगितले. वन खात्याने झाडे तोडण्यापूर्वी निर्धारित संख्येत आधी ८ हजार झाडे लावा, अशी सक्ती केली असून विविध ठिकाणी ५ हजार झाडांची लागवड सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
 
वीजमंत्री नीलेश काब्राल बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यांना उपस्थितांनी जोरदार आक्षेप घेतला. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना नीलेश काब्राल यांनी एका पत्रकार परिषदेत देशद्रोही म्हटले होते, त्यामुळे आंदोलनकर्ते देशद्रोही कसे ते आधी सिद्ध करा, आणि नंतरच काय ते बोला, अशा शब्दात आंदोलकांनी सुनावले. तरीही दुसऱ्यांदा नीलेश काब्राल बोलण्यास उभे राहिल्यावर आंदोलकांनी प्रचंड गदारोळ केला. मात्र काब्राल यांनी त्याही गोंधळात आपले म्हणणे मांडले व गोवा विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी हा प्रकल्प आवश्‍यक असून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे सांगितले. 

संबंधित बातम्या