फोंडा: "गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय हलविण्याचा प्रस्ताव शासनासमोर आला नाही"
Goa that there has never been a proposal before the Government to shift Goa Engineering College

फोंडा: "गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय हलविण्याचा प्रस्ताव शासनासमोर आला नाही"

फोंडा: राज्यात तळागाळात शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून मगो पक्षाचे नेते व पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी प्रयत्न केले, त्यामुळेच गोवा साक्षर होण्यास मदतच झाली. पण आता भाऊसाहेबांच्या या साक्षरतेच्या विचारांनाच सुरुंग लावण्याचा प्रकार घडत असून फर्मागुढी - फोंड्यातील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय चक्क बांबोळी पठारावर नेऊन फर्मागुढीत ‘आयआयटी’ सुरू करण्याचा सरकार पातळीवर डाव असल्याचे सांगून मगो पक्षाचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. 

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयासह राज्यातील अन्य तांत्रिक महाविद्यालये ही राज्यातील तांत्रिक विद्यापीठाशी संलग्न नाहीत. त्यामुळे राज्यात गोवा टेक्‍निकल युनिव्हर्सिटीची त्वरित स्थापना करून त्याला गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयासह अन्य तांत्रिक महाविद्यालये संलग्नित करा, आणि दिल्लीतून होणाऱ्या अशाप्रकारच्या हालचालींना पायबंद घाला, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. 

फर्मागुढी परिसर हा शारदेचे प्रांगण म्हणून ओळखला जातो. भाऊसाहेब बांदोडकर यांनी या शैक्षणिक क्षेत्राची स्थापना केल्याने अनेक विद्यार्थ्यांना सोईस्कर ठरले. मात्र आता ‘आयआयटी’ फर्मागुढीत सुरू करण्यासाठी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय बांबोळीला हलवून नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल करून विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका, फर्मागुढीच्या या शैक्षणिक परिसरात अनेक लोक रोजीरोटी चालवतात, त्यांच्या पोटावर पाय देऊ नका, असा सल्लाही सुदिन ढवळीकर यांनी दिला. 

दिल्लीस्थित आयआयटीशी संबंधित संचालकांनी गोवा विद्यापीठाच्या संबंधितांशी संपर्क साधला असून याकामी गोवा सरकारमधील दोन सचिवही सहकार्य करीत असून उद्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय बांबोळीला हलवले तर गैरसोयच होणार असून हे टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्वरित या लक्ष घालून विद्यार्थी व या परिसरात रोजीरोटी चालवणाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले पण!

फर्मागुढीतील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय बांबोळीला हलवण्याचा डाव आपण उघड केला असून विधानसभेतही हा प्रश्‍न उपस्थित केल्याने मुख्यमंत्र्यांनी आपण तसे होऊ देणार नसल्याचे आश्‍वासन दिले आहे, पण मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळण्याची गरज असून ‘आयआयटी’साठी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय इतरत्र हलवणे गैर असून आपला या प्रकाराला तीव्र विरोध असून प्रसंगी लोकच याप्रकरणी जाब विचारतील, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

"मी गोव्यातील लोकांना हे सांगू इच्छितो की गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय फर्मागुडी येथून हलविण्याचा शासनासमोर कोणताही प्रस्ताव आला नव्हता आणि तो कायमच विद्यमान परिसरामध्ये राहील. काही राजकारणी बनावट बातम्या पसरवून प्रासंगिकता शोधण्यासाठी धडपडत आहेत,"असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com