तेराशे शेतकऱ्यांची नावे भू-वापर नोंदवहीतून गायब

वार्ताहर
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

म्हापशातील प्रकार : बोडगेश्‍वर शेतकरी संघटनेचे नगराध्यक्षांना निवेदन

म्हापसा: उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाने राज्य सरकारच्या आदेशानुसार, म्हापसा शहराचा भू-वापर नकाशा व भू-वापर नोंदवही तयार करताना म्हापशातील १३०० शेतकऱ्यांची नावे त्या भू-वापर नोंद वहीमधून गायब केल्यामुळे आज बोडगेश्‍वर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष रायन ब्रांगाझा यांची भेट घेऊन ही नावे पुन्हा भू-वापर रजिस्टरमध्ये त्याचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.

बोडगेश्‍वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे यांच्या नेतृत्वाखाली म्हापशातील शेतकऱ्यांनी नगराध्यक्षांची त्यांच्या पालिकेतील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी शिष्टमंडळाने उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाचे सदस्य सचिव आर.एम. पंडिता यांना म्हापशात बोलविण्याचा आग्रह धरला तसेच कुणीही हे कारस्थान केले आहे त्याचा तपास करण्याची मागणी केली. 

आपण पीडीएचे सदस्य सचिव आर.एम. पंडिता यांना आपल्या कार्यालयात चर्चेसाठी बोलाविण्याचा मला अधिकार नाही. तेव्हा तुमच्या तक्रारीसह आपण पणजी येथील पीडीए कार्यालयात येतो, असे आश्‍वासन नगराध्यक्ष रायन ब्रांगाझा यांनी शिष्टमंडळाला दिले. 

बोडगेश्‍वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे म्हणाले, नगराध्यक्षांनी म्हापशातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. 

पीडीएचे सदस्य सचिवांना आपल्या कार्यालयात बोलावून शेतकरी मित्रांसमवेत त्यांनी चर्चा करण्याची गरज आहे. पण त्यांनी त्याला बोलविण्यास नकार दिला आहे. ही शोकांतिका म्हापसेकरांसाठी आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही हे आंदोलन पूर्ण गोवाभर नेणार असून नगराध्यक्षांनी पीडीएच्या सदस्य सचिवाविरोधात पोलिस तक्रार नोंद करावी. म्हापशातील शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदा बळकविण्याचा हा प्रयत्न आहे, असे बर्डे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या