कैदी पलायनप्रकरणी तीन तुरुंग रक्षक निलंबित; निष्काळजीपणाचा ठपका

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

सुरक्षेचे काम आयआरबी पोलिस, गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे कर्मचारी तसेच कारागृहाचे तुरुंगरक्षक करत असल्याने या तिन्ही खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल बैठक झाली.

पणजी: कोलवाळ कारागृहातून बलात्कार प्रकरणातील कैदी रामचंद्र यल्लापा याने केलेल्या पलायन प्रकरणी सहाय्यक जेलर परेश गावस देसाई, हेड जेलगार्ड अनंत गावस व जेलगार्ड उल्हास तळेकर यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. आणखी दोघेजण निलंबित होण्याची शक्यता असून त्यात सहाय्यक अधीक्षक व जेलगाई यांची चौकशी सुरु आहे अशी माहिती वरिष्ठ कारागृह अधिकाऱ्यांनी दिली. 

महिन्याभराच्या काळात दोघा कैद्यांनी पलायन केल्याने कारागृहातील सुरक्षेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह उभे राहिले असून या घटनांची गंभीर दखल सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. सुरक्षेचे काम आयआरबी पोलिस, गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे कर्मचारी तसेच कारागृहाचे

तुरुंगरक्षक करत असल्याने या तिन्ही खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल बैठक झाली. या अधिकाऱ्यांनी कारागृहाला भेट देत तेथील असलेल्या त्रुटी व त्यावर सूचना केल्या आहेत. त्यांसदर्भातचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या कारागृहातील आतील संरक्षक भिंत तसेच मुख्य संरक्षक भिंतीवर काटेरी तारा लावण्याबरोबरच कारागृहातील काही भाग मोकळा व सुटसुटीत करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. 

या कारागृहात आत जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. पहिल्या प्रवेशद्वारावर आयआरबीचे पोलिस तैनात असतात. दुसऱ्या प्रवेशद्वारवर गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षा कर्मचारी तर तिसऱ्या प्रवेशद्वारावर कारागृहाचे तुरुंगरक्षक असतात. या तिन्ही प्रवेशद्वारावर सुरक्षा असतानाही कैदी रामचंद्र यल्लाप्पा याने पलायन केल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत. कारागृहाची आतील संरक्षण भिंत ही सुमारे १५ फूट उंच आहे त्यामुळे त्यावरून तो उडी मारू शकतो मात्र त्याच्या बाहेर असलेली मुख्य संरक्षक भिंतीची उंची सुमारे ३० फुटपेक्षा अधिक आहे.  त्यामुळे या भिंतीवरून तो उडी मारूच शकत नाही. त्यामुळे सकाळच्यावेळी जे तुरुंग कर्मचारी ड्युटीवर होते त्यांच्या निष्काळजीपणामुळे कैदी पळाला असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

पलायन केलेल्या कैद्याला लपून राहण्याची सवय आहे त्यामुळे कारागृहातील सर्व भाग पोलिस व तुरुंग रक्षकांनी पिंजून काढला होता. मडगाव न्यायालयातून तो शौचालयाच्या खिडकीची लोखंडी गज वाकवून तो पसार झाला होता मात्र न्यायालय इमारतीतून तो बाहेर न जाता छप्परावर दडून बसला.  पोलिसांनी त्याचा बसस्थानके व रेल्वेस्थानके या ठिकाणी त्यावेळी शोध घेतला मात्र सापडला नव्हता. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास 

आंतरराज्य बसमधून त्याने गोव्याबाहेर पलायन केले होते. त्याच्या या ‘मोडस ऑपरेंडी’मुळे काल पूर्ण दिवस कारागृहात शोध घेण्यात आला होता मात्र तो सापडला नाही.

पूर्वनियोजित कट?
कैदी रामचंद्र यल्लाप्पा याला गेल्या रविवारी कारागृहातील स्वयंपाकाच्या कामासाठी स्थलांतर करण्यात आले होते मात्र हे सर्व काही कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न विचारता केले गेले होते. त्याला तेथे कोणी स्थलांतर केले व त्यामागे कोणते कारण होते. त्याला पलायन करण्यास हा पूर्वनियोजित कट आखण्यात आला होता का याची चौकशी केली जात आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या