मडगावातील ५० व्यावसायिकांवर कोरोनामुळे परवाने रद्द करण्याची वेळ

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

टाळेबंदीतील मंदीमुळे हॉटेलचे भाडे व कामगारांच्या पगाराचे गणित न जमल्याने अनेकांना आपले हॉटेले बंद करावी लागली आहेत. मडगाव येथील हॉटेल व्यावसायिक दिनेश शेट्टी यांनी कामगार नसल्याने हॉटेल बंद ठेवण्यात आले असल्याचे सांगितले.

नावेली: कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्यातील व्यापाऱ्यांना आर्थिक मंदीचा फटका बसल्याने तसेच बाजारात ग्राहक नसल्याने व्यापाऱ्यांना व्यापार शुल्क भरणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची सर्वाधिक झळ हॉटेल व्यावसायिकांना बसली आहे. 

मडगाव पालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्‍या सुमारे ५० व्यावसायिकांनी आपला व्यापार परवाना रद्द करण्यासाठी पालिकेजवळ अर्ज केले आहेत. कोरोनामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे तब्बल तीन महिने राज्यातील सर्वच व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. याकाळात काम नसल्याचे गोव्यात विविध हॉटेल मध्ये असलेले परप्रांतीय कामगार श्रमिक रेल्वेमधून आपापल्या राज्यातील मुळगावी गेले होते.

लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू न झाल्याने आपल्या मुळ गावी गेलेल्या कामगारांना परत येणे शक्य नाही. तसेच बाजारात ग्राहक फिरकत नसल्याने अनेकांनी आपली हॉटेले बंद ठेवणे पसंत केले आहे. टाळेबंदीतील मंदीमुळे हॉटेलचे भाडे व कामगारांच्या पगाराचे गणित न जमल्याने अनेकांना आपले हॉटेले बंद करावी लागली आहेत. मडगाव येथील हॉटेल व्यावसायिक दिनेश शेट्टी यांनी कामगार नसल्याने हॉटेल बंद ठेवण्यात आले असल्याचे सांगितले.

पालिका मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांना यासंबधी विचारले असता त्यांनी आपल्याजवळ गेल्या आठवड्यात शुल्क भरणे शक्य नसल्याचे कारण देऊन ५० व्यावसायिकांनी आपले व्यापार परवाने रद्द करण्यासाठी अर्ज केल्याचे सांगितले. ही स्थिती अशीच राहिल्यास अजूनही अर्ज वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या