Goa: नेत्रावळीची आर्थिक घडी विस्कटली

Goa: कर्फ्यूचा परिणाम : पर्यटन स्‍थळांवर घातलेली बंदी उठवण्‍याची मागणी
Goa: नेत्रावळीची आर्थिक घडी विस्कटली
Goa: Waterfall in Netravali.Dainik Gomantak

सांगे : नेत्रावळी (Netravali, Goa) गाव गेल्‍या काही वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. परंतु, कोरोना महामारीमुळे (Corona) येथील लोकांची आर्थिक घडी विस्‍कटली आहे. त्‍यामुळे सरकारने पर्यटन स्‍थळांवर घातलेली बंदी उठविण्‍याची मागणी नेत्रावळीतील व्‍यावसायिक व ग्रामस्‍थांतून होत आहे.

नेत्रावळीला ओळखले जाते, ते भुरळ घालणाऱ्या फेसाळत्या धबधब्यांसाठी. कधीकाळी ग्रामीण भाग म्हणून ओळख असलेल्या नेत्रावळी गावाला पावसाळी पर्यटन किंवा निसर्ग पर्यटन स्‍थळ म्हणून नावलौकिक मिळाला. पूर्वी मोजक्याच लोकांच्या बागायती आणि दूध व्यवसाय सोडल्यास दुसरा पर्याय नेत्रावळीत नव्हता. केवळ पर्यटन व्यवसायामुळे नेत्रावळीत वेगाने बदल होत गेला. गेल्या आठ-दहा वर्षांत पर्यटनाच्‍या दृष्टीने नेत्रावळी गाव बहरत होता. अनेक धबधबे, बुडबुड तळी, जवळून पाहता येणारा निसर्ग, स्ट्रॉबेरी, थंड हवेचा साळजिणी गाव अशा अनेक पर्यटन स्थळांमुळे नेत्रावळीला बारमाही पर्यटक येत असत. पण गेल्या दीड वर्षात कोविड महामारीमुळे हे पर्यटन ठिकाण निर्जन झाल्याने गावातील अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. लहान-मोठे व्यवहार ठप्प झाले. वन खात्याच्या महसुलात घट झाला. पर्यटन स्‍थळांवर घातलेल्या बंदीमुळे नेत्रावळीतील आर्थिक चक्र थांबल्याने लोकांची परिस्थिती कठीण बनली आहे. म्हणून सरकारने फेरविचार करून पर्यटन स्थळांवर घातलेली बंदी उठविण्याची मागणी नेत्रावळी भागातून होऊ लागली आहे.

Goa: Waterfall in Netravali.
Goa: आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या कॉंग्रेसमधील प्रवेशाला कॉंग्रेसमधूनच विरोध

नेत्रावळीत असलेल्या निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा आस्वाद घेण्यासाठी सुट्टीच्या दिवसात व खास करून शनिवार-रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असायची. शनिवार-रविवारी अनेक पर्यटक आपल्या कुटुंबाला घेऊन नेत्रावळीत वास्तव्य करीत असत. त्यातून नेत्रावळीतील लोकांना अर्थप्राप्ती होत असे. अनेक ठिकाणी राहण्याची व्यवस्था होती. पर्यटन वृद्धी होत गेल्याने रस्त्याच्या बाजूला अनेक लहान-मोठे व्यवसाय सुरू झाले होते. किमान आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवता येत असे. पण, पर्यटन बंदीमुळे गेली दीड वर्ष लोकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

सरकारने राज्यात सर्व व्यवहार सुरू केले, मात्र पर्यटनावर बंदी आहे. त्‍यामुळे येथील पर्यटन स्थळांवर जाता येत नाही. वन खात्याने तपासणी नाके तयार केले आहेत. तेथून पर्यटकांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. पावसाळ्यात तशी मोठी गर्दी होत नसते, पण पावसाळ्‍यातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. त्यातून थोडीफार आर्थिक प्राप्‍ती होत असते. पण आता कोविडमुळे चित्र पालटले आहे. बंदी उठविल्यानंतर नेत्रावळीत जितके पर्यटक येतील त्यापेक्षा दुप्पट पर्यटक सध्‍या राज्‍यातील समुद्र किनाऱ्यांवर फिरत आहेत, असेही काही ग्रामस्‍थांनी सांगितले.

सरकारी महसूल बुडाला

नेत्रावळीतील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातल्याने ग्रामस्‍थांचा रोजगार बुडाला आहेच, शिवाय शासनाचा महसुलही बुडाला आहे. पर्यटकांकडून वनखाते कर गोळा करीत असे. व्यक्तीसाठी वेगळा आणि दुचाकी व इतर वाहनांना वेगळा कर भरावा लागत असे. बंदीमुळे शासनाला या कराला मुकावे लागले आहे.

नेत्रावळीत पर्यटन व्यवसाय सुरू झाल्याने वर्षभर पर्यटकांची वर्दळ सुरू होती. अनेकांना रोजगाराच्‍या संधी उपलब्ध झाल्या होत्या. मात्र, कोविड काळात सर्वांची परिस्थिती बदलून गेली आहे. बंदीमुळे सर्व ठिकाणी सामसूम पसरली आहे. व्यवसाय थंडावले त्‍यामुळे व्‍यावसायिकांच्‍या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने नुकसान भरपाई कोणालाच दिली नाही. निदान पर्यटनावर घातलेली बंदी उठविल्यास पुन्‍हा एकदा नेत्रावळीत रोजगार निर्मिती होऊ शकेल. याचा विचार करून शासनाने पंधरा ऑगस्टपूर्वी पर्यटन स्थळांवरील बंदी उठवावी; जेणेकरून नेत्रावळी गाव आर्थिकदृष्‍ट्या सावरू शकेल.

- अभिजित देसाई, उपसरपंच, नेत्रावळी

Goa: Waterfall in Netravali.
सहकारी पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांना मार्गदर्शन 

Related Stories

No stories found.