पर्यटकांना घरे भाड्याने देणाऱ्यांसाठी पर्यटन खात्याकडे नोंदणी सक्तीचीच: मंत्री बाबू आजगावकर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

गोवा हे पर्यनट स्थळ असल्याने या ठिकाणी जगभरातून लोक येतात. त्यामुळे राज्य तसेच देशाच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होतो. यातूनच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची नोंद आवश्यक असण्याचा मुद्दा पुढे आला आहे.

पेडणे: पर्यटकांना अनधिकृतपणे भाड्याने घरे, खोल्या देणारे व्यावसायिक व  हॉटेलना पर्यटन खात्याकडे नोंदणी करणे अनिवार्य असून राज्य व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. यावर सरकार कोणताही समझोता करणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे. 

ट्रॅव्हल पोर्टलवर बुकिंग करण्यासाठी संबंधित हॉटेलची किंवा भाड्याने घरे देणाऱ्या व्यावसायिकांची पर्यटन खात्याकडे नोंद नसल्यास ऑनलाईन बुकिंग करता येत नसल्याने पर्यटन व्यावसायिकांना फटका बसत असल्याचा मुद्दा काही जण उपस्थित करत आहेत. पण, नोंदणी सक्तीची करण्याची पर्यटन खात्याची भूमिका राज्य व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि पर्यटन व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी महत्त्वाची असून नोंदणीच्या सक्तीच्या विषयावर पर्यटन खाते ठाम आहे, असे आजगावकर यांनी सांगितले. 

पर्यटन व्यवसायात सुसूत्रता यावी व सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही कमतरता राहू नये या उद्देशाने पर्यटन खात्याने हा नियम लागू केला आहे. पर्यटकांना भाड्याने घरे - खोल्या देणाऱ्यांच्या विरोधात पर्यटन खाते नाही. उलट पर्यटन वृद्धी व्हावी व पर्यटनातून रोजगार निर्मिती व्हावी, स्थानिकांचा उदरनिर्वाह चालावा अशी आमची भूमिका आहे. पण, यात सुसूत्रता यावी हा आमचा उद्देश आहे, असे आजगावकर यांनी सांगितले. 

गोवा हे पर्यनट स्थळ असल्याने या ठिकाणी जगभरातून लोक येतात. त्यामुळे राज्य तसेच देशाच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होतो. यातूनच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची नोंद आवश्यक असण्याचा मुद्दा पुढे आला आहे. मागे झालेल्या पर्यटन व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या बैठकीतही हा मुद्दा चर्चेत आला होता व या सर्व घटकांच्या संमतीनेच हा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले. 

सरकार पर्यटन व्यावसायिकांच्या विरोधात नाही. उलट सरकार पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहनच देते. पर्यटन खात्याकडे नोंदणी करण्यासाठी घरपट्टीची पावतीही पुरेशी आहे. आपली घरे - खोल्या भाड्याने देणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटन खात्याकडे नोंदणी करण्यास पुढे यावे. यात राज्याचे व या व्यावसायिकांचेही हीत आहे. नोंदणी करण्यास कोणालाही काही अडचण व अडथळा आल्यास त्यांनी आपल्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आजगावकर यांनी केले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या