गोवा पर्यटन विकास महामंडळ साकारणार मये तलावाच्या ठिकाणी ‘थीम पार्क’

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

मये येथील तलाव हे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण राहिलेले असून मोठ्या संख्येने पर्यटक तेथे भेट देत असतात. याची दखल घेऊन गोवा पर्यटन विकास महामंडळाने तेथे इको थीम पार्क वा ॲम्युजमेंट पार्क विकसित करण्याचा विचार पुढे आणला आहे.

पणजी: मये येथील तलाव हे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण राहिलेले असून मोठ्या संख्येने पर्यटक तेथे भेट देत असतात. याची दखल घेऊन गोवा पर्यटन विकास महामंडळाने तेथे इको थीम पार्क वा ॲम्युजमेंट पार्क विकसित करण्याचा विचार पुढे आणला आहे. सदर पार्कमध्ये निवासी सुविधाही उपलब्ध करण्याची योजना आहे.

मये येथील प्रसिद्ध तलावाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात आणि बंजी जंपिंगसह साहसी क्रीडा सुविधा 2019 मध्ये उपलब्ध केल्यापासून सदर ठिकाण जास्तच प्रसिद्ध झालेले आहे. महामंडळातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी आता एक थीम पार्क विकसित करण्याची योजना असून निसर्गावर भर देऊन या पार्कची उभारणी केली जाईल. तसेच तेथे कुटुंबे आकर्षित होतील या पद्धतीने त्याची आखणी केली जाईल.

महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी तीन वेळा गोवा पर्यटन विकास महामंडळाने यासंदर्भात केलेला प्रयत्न गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळविण्यात अपयशी ठरला आहे. सध्याची आर्थिक स्थिती ही फारशी अनुकूल नसून मोठे थीम पार्क देखील सध्या नुकसानीत चालत आहेत. तरीही गोवा पर्यटन विकास महामंडळाचा हा प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. सदर प्रकल्प हा महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पांढरा हत्ती बनवायचा नसून महामंडळ त्यासाठी वेगळा मॉडेल अनुसरू पाहत आहे. त्यामुळे सदर सुविधा ही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल, असे सांगण्यात आले आहे.

गोवा: राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातील व्यत्यय भोवला; कंपनीच्या बिलात 5.50 लाखांची कपात 

या प्रकल्पाला अजून उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाकडून अंतिम परवानगी मिळायची आहे. कारण २०२१ च्या बाह्य विकास आराखड्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे ना हरकत दाखला देता येत नाही. पुरातत्त्व संचालनालय आणि नगर व नियोजन खात्याच्या संवर्धन समितीकडूनही परवानगी मिळणे बाकी आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण व वन मंत्रालयाकडून पर्यावरणीय मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
 

संबंधित बातम्या