समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांकडून ‘एसओपी’चा फज्जा; कोरोनाचा संसर्ग वाढीची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

विविध राज्यांतून येणारे हे पर्यटक तोंडाला मास्क न लावताच समुद्रकिनाऱ्यावर तसेच पाण्यात उतरत असतानाही पर्यटन पोलिस तसेच संबंधित पंचायतीकडून कारवाईकडे डोळेझाक करत असल्याने या मार्गदर्शक सूचनांचा फज्जा उडाला आहे. 

पणजी: ‘कोविड -१९’च्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदीच्या काळातील बंद असलेल्या राज्याच्या सीमा खुल्या करण्यात आल्यापासून समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजू लागले आहेत. पर्यटकांना प्रवेश खुला झाला, तरी मार्गदर्शक सूचना (एसओपी) बंधनकारक असूनही त्याचे काटेकोरपणे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

विविध राज्यांतून येणारे हे पर्यटक तोंडाला मास्क न लावताच समुद्रकिनाऱ्यावर तसेच पाण्यात उतरत असतानाही पर्यटन पोलिस तसेच संबंधित पंचायतीकडून कारवाईकडे डोळेझाक करत असल्याने या मार्गदर्शक सूचनांचा फज्जा उडाला आहे. 

राज्यात पर्यटन व्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने तो पूर्ववत करून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने काही प्रमाणात टाळेबंदी उठविल्यावर राज्य सरकारने सीमा खुल्या केल्या. सक्तीची असलेली कोविड चाचणी गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना बंद करण्यात आल्याने पर्यटकांनी स्वतःची वाहने घेऊन येण्यास सुरवात केली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणे तसेच सुरक्षित अंतर ठेवण्याची मार्गदर्शक सूचनांनुसार सक्ती आहे. मात्र, हे पर्यटक त्यापैकी एकाचेही पालन करत नाहीत, हे समुद्रकिनाऱ्यांवर दिसून येत आहे.

समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना रस्त्यावर असलेले पर्यटन पोलिस तोंडाला मास्क वापरण्याच्या सूचना करतात. मात्र, हे पर्यटक समुद्रकिनाऱ्याच्या जवळ गेल्यावर व पाण्यात जाताना तो मास्क काढतात. त्यामुळे राज्यात आधीच कोविड महामारीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना या पर्यटकांच्या बेशिस्त वागण्यामुळे राज्याला धोका संभवण्याची शक्यता आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या