Goa: बोरीतील वाहतूक बेटांचा आकार घटवावा

Goa: रस्‍ते अरुंद : अपघातांचे प्रमाण कमी करण्‍यासाठी उपाययोजना आवश्‍‍यक
Goa: बोरीतील वाहतूक बेटांचा आकार घटवावा
Goa: Byathakhol Circle In Bori.Dainik Gomantak

बोरी : बोरी गावात बोरी (Bori, Goa) पूल जोडरस्ता सर्कल आणि बायथाखोल बोरीच्या उतरणीवर असलेल्‍या चार वाहतूक बेटांच्या ठिकाणी वारंवार घडणारे अपघात टाळण्यासाठी या वाहतूक बेटांचा आकार कमी करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विश्र्वंभर ऊर्फ बाप्पा देवारी यांनी केली आहे.

बोरी गावातून जाणारा हमरस्ता अपघात प्रवण रस्ता म्हणून नोंद आहे. आधीच हा रस्ता अरुंद असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने घरे आणि दुकाने तसेच धार्मिक स्थळे असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करता येत नाही. बोरी येथील झुवारी नदीवरील पूल म्हणजे दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. कुठ्ठाळीचा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंद केल्यापासून बेळगाव, हुबळी-धारवाड, कोल्हापूर, सांगली आदी भागातून वेर्णा औद्योगिक वसाहत, सां जुझे औद्योगिक वसाहत आणि वास्को बंदरातून येणाऱ्या मालाची ने-आण करणारी अवजड मालवाहू वाहने बोरी पुलावरूनच जातात. त्यातच इंधन घेऊन जाणारे टॅंकर, प्रवासी बसेस मोठ्या प्रमाणावर पणजी, मडगाव, वास्को, कारवार, सावर्डे, सांगे, कुडचडे भागात या रस्त्यावरूनच जातात.

Goa: Byathakhol Circle In Bori.
Goa: कुंकळ्ळी नगरपालिकेतील फाईली होतात गायब

बोरी पुलाच्या जोडरस्त्यावर पाच वाहतूक बेटे आहेत. त्‍यातील मधले वाहतूक बेट खूपच मोठ्या व्यासाचे आहे, तर रस्‍ता अरुंद आहे. बोरी पुलावरून फोंडा, शिरोडा, बोरीच्या दिशेने येणारा रस्ता उतरणीचा आहे. त्यामुळे या मोठ्या व्यासाच्या वाहतूक बेटावरील अरुंद रस्त्यावर गेल्या ३४ वर्षांत अनेक वाहनांचे अपघात होऊन किमान डझनभर माणसांचे बळी गेले आहेत. २०२० साली ५ ऑगस्टला मडगावहून माशेल भागात विजेचे खांब घेऊन जाणारा एक ट्रक या सर्कल जवळ कोसळून वीज खात्याचे कर्मचारी चिरडून मरण पावले होते. त्‍यावेळी ‘गोमन्तक’ने या संबंधी वृत्त प्रसिद्ध करून या सर्कलवरील वाहतूक बेटांचा आकार कमी करावा, अशी सूचना केली होती. अपघाताच्या वेळी पाहणी करण्यास आलेले आमदार सुभाष शिरोडकर, बोरीचे सरपंच, उपसरपंच यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाच्या अभियंत्यांनी या वाहतूक बेटांचा आकार कमी करण्‍याचा शब्द दिला होता, परंतु सात महिने उलटले तरी हे काम हाती घेतले नव्हते. ‘गोमन्तक’ने याचा पाठपुरावा केल्यावर फक्त दोन वाहतूक बेटांचा आकार कमी करण्‍यात आला. आकार कमी केलेल्या बेटांकडील रस्ता मात्र दुरुस्त न केल्याने तो अपघातांना निमंत्रण देत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

वेगामुळेही अपघात

बायथाखोल बोरीच्या उतरणीवर आणि बेतोडा-कुर्टी बगल रस्त्याच्या तिठ्याच्या रस्त्यावर चार मोठी वाहतूक बेटे असून, फोंड्याहून बोरीच्या दिशेने उतरणीवरून येणारी वाहने तसेच बेतोडा-कुर्टी मार्गे येणारी वाहने वेगाने येत असल्याने वारंवार अपघात घडतात. मंगळवार, दि. २४ रोजी मुंबई येथून मडगावच्या दिशेने वेगाने जाणारी बस उलटून असाच अपघात घडला. ही वाहतूक बेटांचा आकार कमी करून वाहनांसाठी जागा मोकळी करून देणे गरजेचे आहे.

Goa: Byathakhol Circle In Bori.
Goa: मडगाव अर्बन बँकेच्या ठेवी परतावा प्रक्रिया सुरू

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com